यंदा ३१ ऑगस्टला घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. भक्तांनी अगदी मनोभावे आपल्या बाप्पाची सेवा केली. त्याला चविष्ट नैवेद्य अर्पण केले. गेले काही दिवस घराघरात भजन आणि आरत्यांचा आवाज घुमत होता. गणेशाचा पाहुणचार करताना हे सहा-सात दिवस कसे गेले कोणालाच समजलं नाही आणि बघता-बघता बाप्पाच्या जाण्याची वेळ आलीसुद्धा! दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
मात्र, सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा चिमुकला अवघ्या वर्षभराचा असेल, पण बाप्पावरील त्याच प्रेम पाहून तुम्हालाही नवल वाटेल. या व्हिडीओमध्ये एका घरगुती गणपतीचे विसर्जन होत असल्याचं आपण पाहू शकतो. पण हा चिमुकला बाप्पाचं विसर्जन करू देत नाही आहे. त्याने बाप्पाची मूर्ती आपल्या हातात घट्ट धरली आहे. तो ही मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यापासून घरच्यांना रोखत आहे.
या निरागस मुलाचे भाव पाहून तुम्हालाही त्याचे कौतुक वाटेल. ganesh_officals_pargi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आता पर्यंत ७ लाख ७८ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. नेटकऱ्यांना हे बाळ फारच आवडले आहे. या गोंडस मुलाचं कौतुक करताना नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शन भरून टाकला आहे.
गणपती हा देव प्रत्येकाचाच लाडका आहे. लहान असो वा मोठे, सर्वांचाच त्याचावर जीव आहे. असा कोणीही नसेल ज्याला गणपतीचे विसर्जन होत असताना रडू आले नसेल किंवा तो भावुक झाला नसेल. म्हणूनच तर बाप्पाचं विसर्जन करताना आपण त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्यास सांगतो आणि भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देतो.