अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. मंदिराच्या चारही बाजूने दगडी तट आहे. मंदिराच्या आवारात दोन रेखीव दिपमाळा आहेत. मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे.
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
स्थानः ता.जुन्नर जि.पुणे
अंतरः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० वरील नारायणगावपासून व आळे फाट्यापासून जवळ. कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील मढपासूनजवळ. ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी मार्गे जुन्नर