Traffic Changes In Mumbai On Ganesh Festival: मुंबईत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज सर्वत्र गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे, ज्यामुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे प्रवाशांना रस्त्यावर गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. पण, गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान वाहनांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत.

या मार्गांवर निर्बंध

चेंबूर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, मानखुर्द, मुलुंड, साकीनाका, एमआयडीसी, कांदिवली, गोरेगाव, सांताक्रूझ, डीएन नगर आणि सहार या भागात वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. याबाबत टाईम्स नाऊ नवभारतने वृत्त दिले आहे.

हेमू कलानी मार्ग, गिडवानी मार्ग, घाटला व्हिलेज रोड, डॉ. सीजी मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, एलबीएस मार्ग, जेव्हीएलआर मार्ग आणि मध-मार्वे मार्ग यासह अनेक रस्त्यांवर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

नो-पार्किंग झोन आणि रस्ते बंद

गणेश चतुर्थीनिमित्ताने मुंबईतील काही भागातून वाहतूक वळवण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणे नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आली आहेत. देवडे रस्ता, जुहू तारा रस्ता आणि ओशिवरा नाल्याजवळील रस्ते मिरवणुकीदरम्यान पूर्णपणे बंद राहतील.

रेल्वे ओव्हरब्रिजच्या वापराबाबतदेखील विशेष खबरदारी जारी करण्यात आली आहे. कोणत्याही वेळी १०० पेक्षा जास्त लोकांना रेल्वे ओव्हरब्रिज ओलांडण्याची परवानगी असणार नाही. तसेच रेल्वे ओव्हरब्रिजवर मिरवणुका किंवा थांबे काढण्यास सक्त मनाई आहे. याव्यतिरिक्त, सर्व रेल्वे ओव्हरब्रिजवर नाचणे आणि लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे.

शनिवारी जारी केलेल्या वाहतूक बदलाच्या सूचनांनुसार, अनेक मार्गांवर हलक्या वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे, तर दक्षिण मुंबईत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक संथ गतीने

दरम्यान आज गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी मुंबईत अनेक रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. अशात अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाल्याचे चित्र आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, खाजगी बसच्या बिघाडामुळे छोटा सायन येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.