Lord Ganesha Temple in Paris: आज भारतासह जगभरात श्रीगणेश चतुर्थीनिमित्त श्री गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसत आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पाचे आगमन झाले असून भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भारताप्रमाणेच पॅरिसमध्येही गणपती बाप्पाचे मंदिर असून तिथेही आज विशेष उत्साह दिसत आहे. पॅरिसचे नाव काढल्या बरोबर आपल्याला आठवतो आयफेल टॉवर, तेथील प्रशस्त रस्ते आणि टुमदार इमारती. पण या बहुसांस्कृतिक नगरीत आहे एक गणपती बाप्पाचे मंदिर. अनेकांना याबाबत माहीत नाही. युरोममधील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या श्री मणिका विनायक अलयमबद्दल आपण जाणून घेऊया.

श्री मणिका विनायक अलयम हे मंदिर १९८५ मध्ये बांधण्यात आले. पुद्दुचेरी (भारतातील जुनी फ्रेंच वसाहत) आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदू समुदायाने या मंदिराची उभारणी केली. गेल्या अनेक वर्षांत हे मंदिर फ्रान्समधील हिंदूंसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. भारतीय लोकांबरोबर इथली संस्कृती आणि परंपराही कशी प्रवास करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हे मंदिर श्री गणरायाला वाहिलेले आहे. विघ्नहर्ता आणि ज्ञान व समृद्धीचे प्रतिक म्हणून स्थानिक हिंदू याकडे पाहतात. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात गणरायाची सुंदर मूर्ती आहे. दक्षिण भारतीय मंदिरातील पद्धतीप्रमाणे या मंदिरात विधी आणि उपासनेच्या पद्धती अवलंबल्या जातात. मंदिरात दररोज पूजा, अभिषेक केला जातो.

गणेश चतुर्थीला निघते मिरवणूक

पॅरिसमधील या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्रीगणेश चतुर्थीला साजरा केला जाणारा गणेश चतुर्थी उत्सव. दरवर्षी, मंदिराच्या वतीने पॅरिसच्या रस्त्यांवर भव्य अशी मिरवणूक काढली जाते. फुलांनी सजवलेली गणेश मूर्ती एका भव्य रथातून रस्त्यावरून नेली जाते. भारतातील मिरवणुकीप्रमाणेच इथेही पारंपरिक संगीत, नृत्य आणि मंत्रोच्चार केले जातात. पॅरिसच्या मध्यभागी हा अध्यात्मिक सोहळा दरवर्षी पाहायला मिळतो.

दरवर्षी हिंदू आणि बिगर हिंदू लोक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात. काही वर्षात हा उत्सव इतका लोकप्रिय झाला आहे की, आता तो पॅरिसच्या सांस्कृतिक कॅलेंडरचाही भाग झाला आहे. यामुळे पॅरिसची विविधता आणि समावेशकता दिसून येते.