Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurat: गणेशोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते. पण, भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी सर्वात खास मानली जाते, कारण या दिवसापासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो.

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी भक्त मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला घरी आणतात आणि त्यांची पूजा करतात. याचसोबत भव्य मंडप उभारून बाप्पाची सेवा करतात. भक्त दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा पूर्ण दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे निमंत्रण दिले जाते.

गणेश चतुर्थी २०२५ कधी आहे? (Ganesh Chaturthi Date)

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी होईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी २६ ऑगस्ट दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ ऑगस्ट दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील, त्यामुळे उदय तिथीनुसार गणेशोत्सव २७ ऑगस्ट, बुधवारपासून सुरू होईल.

गणेश चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त २०२५ (Ganesh Chaturthi 2025 Puja Shubh Muhurat)

गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० वाजेपर्यंतचा वेळ सर्वात चांगला आहे. याची एकूण वेळ २ तास ३४ मिनिटे आहे.

गणेश चतुर्थी राहू काळ (Ganesh Chaturthi 2025 Rahu Kaal)

राहू काळ आणि भद्राकाळ हे शुभ कामांसाठी अशुभ मानले जातात. आज राहुकाल दुपारी १२:२२ ते १:५९ पर्यंत आहे. म्हणून गणेश स्थापना दुपारी १२:२२ पूर्वी करणे योग्य ठरेल.

अनंत चतुर्दशी २०२५ कधी आहे? (Anant Chaturdashi)

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असते. या दिवशी गणपती विसर्जन करणे शुभ मानले जाते. यावर्षी अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

गणेश विसर्जनासाठी शुभ चौघडिया मुहूर्त (Ganesh Visarjan Muhurat)

गणेश विसर्जनासाठी शुभ चौघडिया मुहूर्त

  • सकाळचा मुहूर्त (शुभ): सकाळी ७:३६ ते ९:१०
  • दुपारचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत): दुपारी १२:१९ ते संध्याकाळी ५:०२
  • संध्याकाळचा मुहूर्त (लाभ): संध्याकाळी ६:३७ ते रात्री ८:०२
  • रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर): रात्री ९:२८ ते पहाटे १:४५ (७ सप्टेंबर)
  • उषःकाळचा मुहूर्त (लाभ): पहाटे ४:३६ ते सकाळी ६:०२ (७ सप्टेंबर)

गणेश चतुर्थीला बनणारा शुभ योग

यावर्षी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे, जो गणपती बाप्पाचा दिवस मानला जातो. याशिवाय या दिवशी शुक्ल योग, सर्वार्थसिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग निर्माण होत आहेत.