ठाणे : गणेशोत्सव हा उत्सव सर्व जाती, धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. या सणामुळे सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्ह्यात गणपतीचे वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आगमन झाल्यानंतर, रविवारी गौरींचे आगमन देखील करण्यात आले. असे असले तरी आदिवासी प्रवर्गातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या ठाकूर जमातीत मात्र गौरींचे आगमन केले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच गौरी आगमनाच्या दिवशीच गणेशाचे विसर्जन देखील करण्यात आले आहे. या मागे कथा असल्याचे सांगितले जाते.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षानुवर्षापासून या उत्सवामुळे भक्तांच्या मनात आनंदाची आणि चैतन्याची भावना जागृत होते. गणेशाचे आगमन हे केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकता जपण्याचे काम करते. गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत असते. त्याचबरोबर गौरींचे देखील वाजत गाजत आगमन होत असते.

रविवारी, ज्येष्ठ गौरींचे आवाहन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात १५ हजार ३२७ गौरींचे आगमन झाले. यामध्ये सर्वाधिक ६ हजार ५०२ गौरींचे कल्याण – डोंबिवली शहरात आगमन झाले. गौरींचे आगमन हे विविध भागात विविध चालीरितीनुसार केले जाते. शहरी भागात गौरीची मूर्ती तसेच मुखवटा आणून साज शृंगाराने सजवून पूजन केले जाते. तर मुरबाड, शहापूर भागात फुला, पानांची गौर आणली जाते. असे असले तरी आदिवासी प्रवर्गातील ठाकूर जमातीत गौरी आणल्या जात नाही.

नेमकं गौर न आणण्या मागील कारण काय ? महाराष्ट्रात गणेशासह गौरींचे मोठ्या उत्साहात आगमन होत असते. गौरीच्या प्रतिष्ठापनेसाठी भाविक सज्ज असतात. विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरींचे आगमन होते. मात्र आदिवासी प्रवर्गातील महत्वाचा समाज म्हणजे ठाकूर जमातीत गौरी आणल्या जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे.

काही भागात पाना फुलांची गौरी पुजली जाते. यामध्ये विविध रानातील फुले आणि काह वेलींचा समावेश असतो. निर्सगाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाना फुलांची गौर आणली जाते. एकदा गौरी पूजनासाठी रानात गौरीची फुलं आणि पान आणण्यासाठी या समाजातील बाप आणि लेक गेलेले असतात. त्या मुलीचे बाबा पुढे आणि ती मागे चालत असतात. अचानक रानातीव वाघ या मुलीवर झडप घालतो. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू होतो. यानुसार आमच्या गौरीला वाघाने नेले यामुळे आम्ही गौरी आणत नाही असे ठाकूर समाजातील उमेश निरगुडा यांनी सांगितले.