Ganesh Visarjan 2025 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात ६ सप्टेंबरला महाराष्ट्रासह देशभरात विसर्जन सोहळ्याचा उत्साह पाहण्यास मिळाला. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील तमाम शहरांमधली विसर्जन स्थळं दुमदुमून गेल्याचं चित्र पाहण्यास मिळालं. गणेश भक्तांनी इको फ्रेंडली मूर्तींवर भर दिला होता. प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अनेक गणेशभक्तांनी घरांमध्ये विराजमान केलेल्या मूर्ती या पर्यावरणपूरक आणि शाडू मातीच्या असतील यावरच भर दिला होता.
गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. छोट्या मूर्तींसह आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मोठे गणपतीही विसर्जनासाठी दाखल होऊन त्यांचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरी भक्तांच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसली नाही. ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषी वातावरणात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात चौपाटीवर भक्तांनी हजेरी होती. उत्साह, भक्ती आणि भावनांचा संगम स्पष्ट दिसून आला.
पुण्यातील पाच मानाच्या गणपती विसर्जन किती वाजता झालं?
मानाचा पहिला कसबा गणपती -३:४७ वाजता म्हणजेच मिरवणूक सुरु झाल्यापासून ६ तास १७ मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन दुपारी ४:१० वाजता म्हणजेच विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर ६ तास ४० मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन दुपारी ४: ३५ वाजता म्हणजे ७ तास ५ मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती – ४:५९ वाजता म्हणजे ७ तास २९ मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती – ५:३९ वाजता म्हणजे ८ तास ९ मिनिटांनी विसर्जन झालं
दगडूशेठ गणपतीचंं विसर्जन किती वाजता?
पाच मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी झालं. त्याआधी दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी पाहण्यास मिळाली.
नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीत थोडासा वाद
वाकडी बारव येथून परंपरेनुसार नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, माजी आमदार वसंत गिते, शिवसेवा मंडळाचे प्रमुख विनायक पांडे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महापालिकेचा मानाचा गणपती होता. दरवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या गुलालवाडी व्यायामशाळेतील लेझिम पथकातील सदस्यांची संख्या यावेळी अंतर्गत वादामुळे कमी झाल्याचे दिसले. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा चांदीचा गणेश रथात स्थानापन्न झाला होता. शिवसेवा मंडळाची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ढोल पथकांचा निनाद आणि त्यात घोषणांची पडणारी भर मिरवणुकीचा दिमाख वाढवत होते. भर पावसातही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

भिवंडीत वाटण्यात आले दीड लाख वडा-पाव
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या निमित्ताने परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई, भाईंदर,ठाणे आणि भिवंडी परिसरात पाच ते साडेपाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक ते दीड लाख वडापाव भक्तांना वाटप करण्यात आलं. दरम्यान राज्यासह देशभरात अशाच पद्धतीने गणेश विसर्जन सोहळ्याचा उत्साह पाहण्यास मिळाला.