News Flash

त्रास ‘सायनस’चा

‘सायनस’ म्हणजे चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्या. ही सायनसेस दोन्ही डोळ्यांच्या खालच्या बाजूस, डोळ्यांच्या वर कपाळामध्ये, दोन डोळ्यांच्या मधल्या बाजूस आणि नाकाच्या मागे

| October 14, 2014 06:50 am

‘सायनस’ म्हणजे काय?
‘सायनस’ म्हणजे चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्या. ही सायनसेस दोन्ही डोळ्यांच्या खालच्या बाजूस, डोळ्यांच्या वर कपाळामध्ये, दोन डोळ्यांच्या मधल्या बाजूस आणि नाकाच्या मागे असतात. सायनसमध्ये हवा राहात असल्यामुळे चेहऱ्याला हलकेपणा देणे हेच त्यांचे प्रमुख काम आहे. हे काम करतानाच सायनसेस सतत एक प्रकारचा पातळ स्राव ‘म्यूकस’ तयार करत असतात. प्रत्येक सायनसचे लहानसे दरवाजे नाकाच्या आत उघडणारे असतात. त्याद्वारे सायनसने तयार केलेला पातळ म्यूकस आधी नाकात उतरतो आणि पुढे नाकावाटे घशात उतरतो. ही क्रिया आपल्या प्रत्येकाच्या नकळत सातत्याने घडत असते. काही कारणाने सायनसमध्ये तयार होणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढले तर तो स्राव नाकातून घशात जाऊ शकत नाही आणि नाकावाटे वाहायला लागतो. यालाच आपण सर्दी म्हणतो.

सायनसचा त्रास कसा होतो?
सायनसमध्ये वाजवीपेक्षा अधिक पातळ पाणी बनू लागले आणि ते नाकावाटे वाहू शकत नसल्यामुळे सायनसमध्येच साठून राहिले तर तिथे जिवाणूसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना नाकात घट्ट आणि पिवळ्या रंगाचा शेंबूड येत असतो. काही जण याला ‘सर्दी पिकली’ असेही म्हणतात! ही पिवळी सर्दी खूप दिवस टिकते. सायनसचा त्रास म्हणतात तो हाच.

सायनसच्या त्रासाची
(अक्यूट सायन्यूसायटिसची)
लक्षणे-
* सर्दी.
* चेहऱ्यावर जडपणा येणे.
* चेहरा आणि गाल सुजल्यासारखे दिसणे.
* पुढच्या बाजूस किंवा खाली वाकल्यावर डोके आणि गाल दुखणे.
* वरच्या दातांमध्ये ठणका लागणे.
* ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ जो सायनसचा त्रास राहतो त्याला वैद्यकीय भाषेत ‘क्रोनिक सायन्यूसायटिस’ असे म्हणतात. यात सकाळी उठल्यावर नाक श्िंाकरले की घट्ट पिवळा शेंबूड येतो, सतत चेहऱ्यावर जडपणा राहतो, ताजेतवाने वाटत नाही, नाक बंद झाल्यासारखे वाटते, रात्री झोपतानाही नाक जड आणि बंद होते.
* ज्या सायनसच्या त्रासात वारंवार आणि खूप दिवस टिकणारी सर्दी होते, त्याला ‘रीकरंट सायन्यूसायटिस’ म्हणतात. ही सर्दी २-३ महिन्यांनी पुन:पुन्हा होते आणि एकदा सर्दी झाली की ती ८ ते १२ दिवस राहते. या सर्दीची लक्षणेही ‘अक्यूट सायन्यूसायटिस’सारखीच असतात.

-डॉ. निखिल गोखले.
उपाय काय?
* एरवी आपण सर्दी साठून राहू नये आणि ती नाकावाटे वाहती व्हावी यासाठी जे घरगुती उपाय करतो, तेच सायनसचा त्रास कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतात. यात वाफ घेणे, गरम पाण्यात भिजवून पिळून काढलेल्या टॉवेलने चेहरा शेकणे याचा समावेश होतो.
* वाफ घेण्याच्या पाण्यात काही जण निलगिरीचे तेल किंवा नाकाला लावण्याचा बाम घालतात. त्यामुळे नाक मोकळे झाल्यासारखे वाटते.
* सर्दीत पिवळा शेंबूड येणे हे जिवाणूसंसर्गाचे निदर्शक असते. अशा वेळी प्रतिजैविकांसह सर्दी पातळ करणारी औषधे दिली जातात. सायनसच्या त्रासात नाकात सूज येऊन आतील सायनसची दारे लहान होतात. ही सूज कमी करून सायनसेस मोकळी होण्यासाठीही औषधे दिली जातात.
* ज्यांना पुन:पुन्हा आणि खूप दिवस टिकणारा सायनसचा त्रास होतो, त्यांनी सर्दी न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि नाक मोकळे राहण्यासाठी प्राणायाम करण्यासारखे उपाय करता येतील. ‘जलनेती’ (नेझल वॉश) ही आयुर्वेदात सांगितलेली क्रियादेखील सायनसच्या त्रासात उपयुक्त ठरते. यात औषधयुक्त पाणी नाकावाटे आत घेतले जाते आणि सायनसेसना धुऊन हे पाणी पुन्हा बाहेर पडते. मात्र ही क्रिया रीतसर शिकून घेऊन मगच करावी.
* काही व्यक्तींच्या नाकाची आंतररचना मुळातच काहीशी अडचणीची असते. नाकाच्या आत नाकाचे दोन भाग करणारा पडदा असतो. नाकाचे हाड वाढले तर काही जणांच्या बाबतीत हा पडदा कुठल्यातरी बाजूस झुकलेला असतो. त्यामुळे सायनसेसच्या तोंडावर या पडद्याचा दाब पडू लागतो. तसेच नाकाच्या आत उघडणारे सायनसचे तोंड मुळातच लहानही असू शकते. या कारणांमुळे सर्दी आत साठून राहते. असे झाल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो.
केवळ डोके दुखणे म्हणजे सायनसचा त्रास नव्हे
* सारखे डोके दुखले तरी काही जण आपल्याला सायनसचा त्रास असल्याचे सांगतात. हे खरे नाही. डोके दुखण्याचे कारण कोणतेही असू शकते. त्यामुळे प्रत्येक डोकेदुखी हा सायनसचा त्रास नव्हे. विषाणूजन्य सर्दी होते, तेव्हा ताप येतो, नाकात जळजळ होऊन शिंका येतात, नाकातून पातळ पांढरे पाणी वाहते आणि नाक बंद होते. तर काहींना अ‍ॅलर्जीच्या त्रासामुळे शिंका येणे, नाकातून पाणी येणे असे त्रास होतात. अशी सर्दी सायनसच्या त्रासामुळे झालेली नसते.
* उलट काही जणांना सकाळी उठल्यावर नाक शिंकरले की घट्ट पिवळा शेंबूड येणे ही बाब अगदी सामान्य वाटते. प्रत्यक्षात या लोकांना सायनसचा त्रास असतो आणि ते वर्षांनुवर्षे तो सहन करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:50 am

Web Title: problem of sinus
टॅग : Health It
Next Stories
1 रक्तदाब वाढ वाढती समस्या!
2 स्तनाचा कॅन्सर चिकित्सा
3 डोळे हे ‘जुलमी’ गडे!
Just Now!
X