आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्जने सध्या तरी अव्वल स्थान टिकवले आहे. मात्र मागील दोन सामन्यांतील पराभवांतून धडे घेत त्यांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. चेन्नईचा संघ सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झुंजणार आहे.
आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह चेन्नई गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर आहे. या आधीच्या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादकडून २२ धावांनी पराभव पत्करला; परंतु चेपॉकच्या घरच्या मैदानावर परतल्यामुळे चेन्नईच्या विजयाच्या आशा बळावल्या आहेत.
बंगळुरूने १० सामन्यांत ५ विजय मिळवले असून, ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. शनिवारी पावसामुळे दहा षटकांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरूने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सवर रोमहर्षक विजय मिळवला होता. याच आविर्भावात बंगळुरूने चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचा आत्मविश्वास आणखी दुणावू शकेल.
बंगळुरूच्या संघात ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासारखे आतषबाजी करणारे फलंदाज आहेत. शनिवारी युवा मनदीप सिंगने दमदार कामगिरीने बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला. गोलंदाजीच्या विभागात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर त्यांची प्रमुख भिस्त आहे. याचप्रमाणे वरुण आरोन आणि फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसुद्धा संघात आहेत.
अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोन वेळा आयपीएल विजेतेपद काबीज करणाऱ्या चेन्नईच्या संघात सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. ब्राव्होने हैदराबादविरुद्ध अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले होते.