अजिंक्य रहाणेची अप्रतिम नाबाद ९१ धावांची खेळी, त्याला अर्धशतकवीर करुण नायरची मिळालेली सुंदर साथ आणि गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा, या त्रिसूत्रीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी विजय मिळवला. पहिले पाच सामने जिंकल्यावर राजस्थानला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे या सामन्यात गवसलेल्या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १८९ फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला १७५ धावा करता आल्या.
राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे फलंदाज ठराविक फरकानंतर बाद होत राहिले. कर्णधार जे पी डय़ुमिनीने एकहाती किल्ला लढवला खरा, पण त्याला सामना जिंकवून देण्यात अपयश आले. डय़ुमिनीने प्रत्येकी तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावा काढल्या.
तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकत उसळी असलेल्या ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला असला तरी पहिल्या सहा षटकांमध्ये राजस्थानने एकही विकेट न गमावता ४३ धावा फटकावल्या. त्यानंतरच्या अँजेलो मॅथ्यूजच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर शेन वॉटसनने (२१) चौकार लगावला, पण त्यानंतरच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. वॉटसन बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे आणि करुण नायर यांनी संयतपणे खेळ करत संघाचा धावफलक हलता ठेवला. ३४ धावांवर असताना अजिंक्यचा गुरविंदर संधूने झेल सोडत त्याला जीवदान दिले. त्यानंतर नायरच्या साथीने त्याने संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अप्रतिम पूलच्या फटक्यावर षटकार वसूल करत अजिंक्यने अर्धशतक साजरे केले. रहाणेचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर नायरनेही गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. नॅथन कल्टर निलेच्या गोलंदाजीवर नायरला जीवदानही मिळाले. या जीवदानाचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. अजिंक्यच्या साथीने नायरनेही चांगले फटके लगावत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली आणि दिल्लीची गोलंदाजी बोथट केली. नायरला निलेने बाद करत संघाला यश मिळवून दिले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता. नायरने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकार लगावत ६१ धावांची खेळी साकारली. अजिंक्यने नायरच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंमध्ये ११३ धावांची भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
अजिंक्यने या वेळी अप्रतिम खेळीचा नजराणा पुन्हा एकदा देत ‘ऑरेंज कॅप’ पटकावली. दिल्लीची गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ करत अजिंक्यने संपूर्ण मैदानात धावांची बरसात केली. त्याला मिळालेले एक जीवदान सोडले तर त्याच्या नजाकतभऱ्या फटक्यांनी लज्जत वाढवली. अजिंक्यने ५४ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद ९१ धावांची अमूल्य खेळी साकारली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत २ बाद १८९ (अजिंक्य रहाणे नाबाद ९१, करुण नायर ६१; अँजेलो मॅथ्यूज १/२७) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १७५ (जे.पी.डय़ुमिनी ५६; जेम्स फॉकनर २/२२).