स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भोगावी लागलेली दोन वर्षांनी शिक्षा आणि त्यानंतर पुनरागमनात अकराव्या हंगामाचं मिळवलेलं विजेतेपद!! आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या अकराव्या हंगामावर आपली मोहर उमटवली आहे. अंतिम फेरीत सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळवत चेन्नईने आयपीएलमध्ये आपला संघ सर्वोत्तम का आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन हा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हैदराबादच्या आक्रमणाला तोंड देत आक्रमक फटकेबाजी करत वॉटसनने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे अंतिम सामना हैदराबादच्या हातून पुरता निसटून गेला. या खेळीदरम्यान वॉटसनने काही विक्रमांचीही नोंद आपल्या नावावर केली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करणारा वॉटसन दुसरा खेळाडू ठरला आहे. २०१४ च्या हंगामात वृद्धिमान साहाने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना शतक झळकावलं होतं. त्यानंतर यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत वॉटसनने शतक झळकावलं आहे. संपूर्ण आयपीएलमधलं वॉटसनचं हे चौथ तर यंदाच्या हंगामातलं दुसरं शतक ठरलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर शेन वॉटसन फक्त टी-२० क्रिकेट लिगमध्ये खेळतो आहे. यंदाच्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्जने वॉटसनला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. वॉटसननेही फलंदाजी व गोलंदाजीत सुरेख कामगिरी करत आपल्या संघाचा व कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे. अंतिम फेरीतल्या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं.