अष्टपैलू पॅट कमिन्सचं अर्धशतक (नाबाद ५३) आणि त्याला कर्णधार इयॉन मॉर्गनने दिलेली उत्तम साथ याच्या बळावर मुंबईविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने २० षटकात ५ बाद १४८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरूवात खूपच वाईट झाली होती. पण या दोघांनी ५६ चेंडूत नाबाद ८७ धावांची भागीदारी केली. राहुल चहरने २ तर बोल्ट, बुमराह आणि कुल्टर-नाईलने १-१ गडी घेतले.

मोठ्या फटक्यांसाठी ओळखला आंद्रे रसल आजही अयशस्वी ठरला. रसल गोलंदाजी करत असताना बुमराह गोलंदाजीस आला. त्याने टाकलेल्या उसळत्या चेंडू रसलला समजलाच नाही. त्याने चेंडू सोडण्याच्या दृष्टीने बॅट बाजूला नेली, पण दुर्दैवाने चेंडू बॅटला लागला आणि उंच उडाला. चेंडू किपर डी कॉककडे गेला आणि त्याने अप्रतिम झेल टिपला. त्यामुळे रसल केवळ १२ धावा काढून बाद झाला.

पाहा ती विचित्र विकेट-

दोन्ही संघात महत्त्वाचे बदल

कोलकाताच्या संघात दोन बदल करण्यात आले. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला. कोलकाताने फलंदाज टॉम बॅन्टन आणि वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी यांना संघातून बाहेर केलं. त्यांच्या जागी संघात ख्रिस ग्रीन आणि शिवम मावीला यांना संधी दिली. मुंबईच्या संघात फारसे बदल केले जात नसले तरी आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जेन्स पॅटिन्सनला संघाबाहेर ठेवण्यात आले. वेगवान गोलंदाजांवर ताण येऊ नये म्हणून त्याला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्या जागी नॅथन कुल्टर-नाईलला संधी देण्यात आली.