दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ कमी पडला. १८ धावांनी सामन्यात बाजी मारत दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या रणनितीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. फटकेबाजीचा चांगला अनुभव असलेल्या राहुल त्रिपाठीला मधल्या फळीत पाठवणं, फॉर्मात नसलेल्या सुनील नारायणला सलामीला फलंदाजीसाठी पाठवणं यामुळे कार्तिक टीकेचा धनी बनला. यानंतर कोलकात्याला दोनवेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरने दिनेश कार्तिकला मॉर्गन आणि रसेलच्या नंतर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे.

“राहुल त्रिपाठीला आघाडीच्या फळीत संधी देऊन दिनेश कार्तिकने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, पण मॉर्गन आणि रसेलच्या आधी नाही. सुनील नारायण आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. मॉर्गनने चौथ्या आणि रसेलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर कोलकात्याच्या बॅटींग लाईन-अपमध्ये स्थैर्य येईल.” गौतम गंभीर ESPNCricinfo शी बोलत होता. याचसोबत दिनेश कार्तिकने शेवटचं षटक वरुण चक्रवर्तीला देऊन मोठी चूक केल्याचं मतही गंभीरने व्यक्त केलं.

तुमच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाने १८, १९ आणि २० ही षटकं टाकणं अपेक्षित असतं. परंतू दुर्दैवाने दिल्लीविरुद्ध सामन्यात असं झालं नाही. कमिन्स, नारायण, मवी यासारखे गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना त्यांना संधी द्यायला हवी होती. वरुण चक्रवर्तीनेही पहिल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतू सामन्याचं अखेरचं षटक त्याच्याकडून करवून घेणं योग्य निर्णय नव्हता, आणि त्यात शारजासारखं छोटं मैदान असताना नाहीच नाही, असं गंभीर म्हणाला. कोलकात्याकडून मॉर्गन आणि त्रिपाठी यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.