क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत कायरन पोलार्ड व पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामना जिंकण्यासाठी हैदराबादला २०९ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत चांगला मारा केला. परंतू अखेरच्या षटकांत मुंबईच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. डी-कॉकच्या ६७ धावा हे मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

एकीकडे हैदराबादच्या इतर गोलंदाजांवर मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत हल्लाबोल चढवला. परंतू फिरकीपटू राशिद खान यांमध्ये वेगळा ठरला. ज्या मैदानावर गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजांची पिसं काढली जात आहेत, अशा ठिकाणी राशिद खाननने ४ षटकांत २२ धावा देऊन एक बळी घेतला. शारजाच्या मैदानावर गेल्या काही सामन्यांतही गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. संदीप शर्माच्या पहिल्याच षटकात षटकार मारणारा कर्णधार रोहित शर्मा लगेचच झेलबाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी-कॉक यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन सामन्यांतील अपयशानंतर सूर्यकुमारला चांगला सूर गवसला होता. परंतू सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर स्कूपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार बाद झाला, त्याने २७ धावा केल्या. यानंतर इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक जोडीने महत्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी ७८ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईचा डाव सावरला. क्विंटन डी-कॉकने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं.

परंतू राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डी-कॉक माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. यानंतर इशान किशनही ठराविक अंतराने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत मुंबईला डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या धावा काढून दिल्या. सिद्धार्थ कौलने अखेरच्या षटकांत यॉर्कच चेंडू टाकत हार्दिक पांड्याला माघारी धाडलं. परंतू शारजामधील लहान मैदानाचा चांगला वापर करत मुंबईच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत मुंबईला २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने २ तर राशिद खान १ बळी घेतला.