आयपीएलचा तेरावा हंगाम खेळणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघावर १० धावांनी मात करत बंगळुरुने हातातून निसटलेला सामना जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकर यांना बाद करुन पारडं RCB च्या दिशेने झुकवलं. बंगळुरुने या सामन्यात विजय मिळवला असला तरी संघाचा प्रमुख गोलंदाज उमेश यादवच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक, दिग्गजांना धोबीपछाड…पडीकल चमकला

उमेशने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत ४८ धावा मोजल्या. या निमीत्ताने आयपीएलच्या इतिहासात ४० पेक्षा जास्त धावा देण्याची उमेशची ही १७ वी वेळ ठरली आहे. उमेशने बालाजी आणि ब्राव्हो या दोन गोलंदाजांना मागे टाकलं आहे.

उमेश यादव आणि डेल स्टेन या दोन्ही गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. उमेश यादवला एकही विकेट मिळाली नाही. डेल स्टेनने ३.४ षटकांत ३३ धावा देत १ बळी घेतला. हैदराबादच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे त्यांना सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.