सलामीवीर नितीश राणा आणि अष्टपैलू सुनिल नारायण यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने दिल्लीविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी चौथ्या विकेटसाठी भरधाव शतकी भागीदारी केली.

कोलकाताच्या संघात सुनील नारायण आणि राहुल त्रिपाठी असतानाही शुबमन गिलसोबत नितीश राणाला सलामीला पाठवण्यात आले. त्याने या संधीचं सोनं केलं. सुरूवातीला संयमी आणि नंतर फटकेबाज खेळी करत त्याने ३५ चेंडूत अर्धशतक ठोकलं. हे त्याचं IPLकारकिर्दीतील १०वं अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेत १० अर्धशतके ठोकणाऱ्या महेला जयवर्धने, कुमार संगाकारा, ख्रिस लीन आणि करूण नायर यांच्या पंगतीत नितीश राणाने स्थान पटकावले. राणाने ५३ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार लगावत ८१ धावांची खेळी केली.

VIDEO: नितीश राणाचा झंजावात…

दरम्यान, नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत कोलकाताला तीन धक्के दिले होते. शुबमन गिल (९), राहुल त्रिपाठी (१३) आणि दिनेश कार्तिकचा (३) अडसर लवकर दूर झाला होता. पण सलामीला आलेला नितीश राणा आणि मधल्या फळीत संधी मिळालेला सुनिल नारायण या दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. गेल्या काही सामन्यांत फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता न आलेल्या सुनील नारायणनेही अर्धशतक ठोकलं. नारायणने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावा केल्या.