मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात नेहमी आघाडीवर असतो. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या युएईत तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने यंदा आपल्या संघात महाराष्ट्राच्या दिग्विजय देशमुखला स्थान दिलं आहे. लिलावात दिग्विजयवर २० लाखांची बोली लावण्यात आली. मुळचा बीडचा असलेला दिग्विजय स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतो.

सरावादरम्यान दिग्विजय नेट्समध्ये रोहितला गोलंदाजी करत होता. सुरुवातीला दिग्विजय लेग स्टम्पवर मारा करत होता. मध्ये त्याचे एक-दोन चेंडू वाईडही केले. यावेळी रोहितने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे त्याला समजावत…काय अडचण आहे असं विचारलं? यानंतर रोहितने दिग्विजयला गुड लेंग्थवर बॉलिंग करण्याचा सल्ला दिला. रोहितने दिलेला सल्ला दिग्विजय देशमुखने ऐकला आणि गुड लेंग्थवर चेंडू टाकला….सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित त्या चेंडूवर बिट झाला. रोहितने दिग्विजयला ये बात…म्हणत दाद दिली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात आयपीएलचं पाचवं विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने याआधी ४ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चार हंगामात मुंबईने विजेतेपद मिळवलंय. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील एकमेव संघ आहे. त्यामुळे या हंगामात रोहित आणि त्याचे खेळाडू पुन्हा एकदा अशीच कामगिरी करुन दाखवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : ‘हिटमॅन’चा तडाखा, सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर