IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू झाली. यंदाच्या हंगामात सर्व संघांचे जवळपास ७ सामने खेळून झालेले आहेत. दमदार कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स असे दोन संघ गुणतालिकेत वर आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाताच्या संघांचीही कामगिरी खूपच सुधारली दिसते आहे. पण राजस्थान, पंजाब आणि चेन्नईच्या संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. याचदरम्यान अर्धी स्पर्धा उलटून गेल्यानंतर चेन्नईच्या संघाला एक गोष्ट पहिल्यांदा मिळाली.

IPL 2020 मध्ये चेन्नईच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी केवळ २ सामन्यांतच त्यांना विजय मिळवता आला. त्यातील एक सामना चेन्नईने मुंबईसोबत जिंकला तर एक सामना त्यांनी पंजाबसोबत जिंकला. पण CSKसाठी पहिल्या ७ सामन्यांत एक गोष्ट समान होती ती म्हणजे सर्व सामन्यात त्यांना आव्हानाचा पाठलाग करावा लागला. पण मंगळवारच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि अखेर धोनीच्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली.

महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी धोनीच्या CSKने एक बदल केला. गेल्या सामन्यात केदार जाधवच्या जागी संघात स्थान दिलेल्या जगदीशनला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी फिरकीपटू पियुष चावलाला संधी मिळाली. प्रतिस्पर्धी संघ हैदराबादनेही संघात बदल केल्याचं कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितलं. हैदराबादने अभिषेक शर्माच्या जागी संघात शहाबाज नदीमला स्थान दिले.