इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिलाच सामना आहे. या सामन्यात विराट अॅण्ड कंपनी चाहत्यांसाठी खास संदेश घेऊन येत आहेत. हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यापूर्वी आरसीबीने करोना योद्धयांना खास ट्रिब्यूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहली अन् इतर संघातील खेळाडू यंदा जर्सीवर करोना योद्ध्यांची नावं टाकणार आहेत.

आयपीएलमधील सामन्यात आरसीबी संघातील खेळाडूंच्या जर्सीवरील नावं बदलली आहेत. जर्सीवरील कोहली, डिव्हिलियर्स स्टेनची नावे बदलून कोरोना वॉरियर्सचे नाव टाकली आहेत. त्यामुळे विराट कोहली किंवा इतर खेळाडूंची नावं आता जर्सीवर दिसणार नाहीत. आरसीबीनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.


इतकेच नव्हे तर विराट कोहलीसह इतर खेळाडूंनीही आपल्या ट्विटर खात्याचं नावं बदलून कोविड योद्धांची नावं ठेवली आहेत. विराट कोहलीच्या जर्सीवर आता सिमरनजीत तर डिव्हीलियर्सच्या जर्सीवर पारितोष असं नाव दिसेल.

“मी पारितोष यांना अभिवादन करतो त्याने लॉकडाऊन दरम्यान ‘प्रोजेक्ट फीडिंग फ्रॉम फार’सुरु केले आणि गरजूंना जेवण दिले. त्यांच्या आव्हानात्मक मनोभावाचे कौतुक करण्यासाठी मी या हंगामात त्याचे नाव माझ्या जर्सीवर टाकत आहे,” डीव्हिलियर्सने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ज्याचे नाव बदलून परितोष पंत असे ठेवले. परितोष पंत, हा एक विश्रांतीगृह चालवतो ज्याने मुंबईच्या गोवंडी येथे वकील पूजा रेड्डी सोबत मिळून ‘प्रोजेक्ट फीडिंग फ्रॉम फार’ सुरू केले आणि लॉकडाऊन दरम्यान गरजूंना जेवण दिले.


आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या जर्सीवर आणि ट्विटरवर ‘सिमरनजीत’ लिहिल आहे. सिमरनजित सिंह यांनी आपल्या मित्रांसह करोना विषाणू दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी ९८ हजार रुपये जमा केले. गरिबांसाठी देणग्या देण्यासाठी लोकांकडे संपर्क साधला आणि अनेक कर्णबधीर त्याच्यासोबत सामील झाले आहेत.

‘आयपीएल’मध्ये रोहित शर्मा, कोहली यांच्या फटकेबाजीवर क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असते. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून शनिवारी सलामीच्या सामन्यात अपयशी ठरला होता. यास्थितीत कोहलीकडून फटकेबाजीचा आनंद लुटण्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे. उभय संघांची ताकद ही त्यांच्या भक्कम फलंदाजीमध्ये आहे. मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त फलंदाजीच नाही तर सर्व आघाडय़ांवर खेळ सर्वोत्तम होणे आवश्यक आहे, याची कोहलीला जाणीव आहे. कोहलीला अद्याप महेंद्रसिंह धोनी आणि रोहित यांच्याप्रमाणे ‘आयपीएल’ विजेतेपदाचा आनंद लुटता आलेला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला आतापर्यंत तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यास्थितीत अंतिम लढतीपर्यंत कामगिरीत सातत्य टिकवण्याची गरज कोहलीच्या संघासमोर आहे. यंदाच्या संघात फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचचा झालेला समावेश महत्त्वपूर्ण आहे. फिंच धडाकेबाज सुरुवात बेंगळूरुला करून देईल अशी अपेक्षा आहे. युवा सलामीवीर देवदत्त पडिकलकडूनही चांगली सुरुवात अपेक्षित आहे.