मुंबई विद्यापीठाचे आफ्रिका आणि मध्य युरेशिया अभ्यास केंद्राने भारतीय हवाईदलातील अधिकाऱ्यांना एम. फिल आणि पीएच.डी.चे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ आणि हवाई दलात सामंजस्य करार करण्यात आला असून या करारानुसार हवाईदलातील १० अधिकाऱ्यांना दरवर्षी एम. फिल आणि पीएच.डी.चे शिक्षण दिले जाणार आहे.
भारतीय हवाई दल हे झपाटय़ाने विकसित होणारे दल असून येणाऱ्या काळात जागतिक घडामोडींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात विस्तार करणे आवश्यक असणार आहे. हवाई दलातील अधिकाऱ्यांना या विशेष बाबींवर संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. विद्यापीठाच्या आफ्रिका आणि मध्य युरेशिया अभ्यास केंद्रामार्फत हवाई दलातीलअधिकाऱ्यांना धोरण निश्चितीच्या क्षेत्रात, जागतिक शांतता, मानवी सुरक्षा, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध, ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा धोरण, भारत आफ्रिका संबंध या विषयांवर सखोल संशोधनासाठी या दोन्ही अभ्यास केंद्रामार्फत संशोधनाला वाव मिळणार आहे. याव्यतिरिक्त एम. फिऱ्ल आणि पीएच.डी. अंतर्गत लष्करी अभ्यास, एव्हिएशन, एअरोनॉटिक्स, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विधी, समाजशास्त्र, उपयोजित मानव्यशास्त्र या विषंयावरही संशोधन करुन धोरण निश्चितीसाठी त्यांना उपयोग होऊ शकेल.

“युद्धोत्तर काळात युरोशियामध्ये अनेक उलथापालथ झाली आणि त्याचा अभ्यास करणे भारतीय समाजशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञांना गरजेचे होऊन बसले आहे. मुख्यत्वेकरुन ऊर्जा सुरक्षेसाठी या भूभागाकडे पाहणे गरजेचे आहे म्हणून या विषंयावर अभ्यास व्हावा अशी अपेक्षा आहे.”
– डॉ.संजय देशपांडे, संचालक, मध्य युरोशिया अभ्यास केंद्र