मुळातच उशिरा जाहीर झालेला बारावीचा निकाल, अभियांत्रिकी प्रवेशाची नवी पद्धत या सगळ्याचा ताण कमीच होता म्हणून की काय राज्यातील अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आता नवाच पेच उभा राहिला आहे. अभियांत्रिकी शाखेला केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी बोर्डाच्या परीक्षेचे गुण निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत मुदत आहे. मात्र, तोपर्यंत पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यार्थ्यांना मिळणार नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
या वर्षी बारावीचे निकाल उशिरा लागले. मात्र, त्यानंतरही राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या तणावात भर टाकण्याचेच काम सुरू आहे. या वर्षी अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशासाठी बारावीचे गुणही गृहित धरण्यात येणार आहेत. आयआयटी बरोबरच देशपातळीवरील प्रवेशासाठी केंद्रीय परीक्षा मंडळाने (सीबीएससी) राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांंचे गुण घेतले आहेत. विद्यार्थ्यांनी २७ जूनपर्यंत आपले बोर्डाचे गुण निश्चित करायचे आहेत. मात्र, तोपर्यंत राज्य मंडळाच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
या वर्षीही भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची मागणी राज्यमंडळाकडे केली आहे. मात्र, बोर्डाचा निकाल लागून पंधरा दिवस झाले, तरीही विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना छायाप्रत मिळाल्यानंतरही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करून त्यानंतर त्याचा निकाल हाती येण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत बोर्डाचे गुण निश्चित करण्यासाठी सीबीएसईने दिलेली मुदत उलटून जात आहे. दिलेल्या मुदतीनंतर गुण बदलता येणार नाहीत, अशी सूचना सीबीएसईने दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर आता नवाच पेच निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया कोटय़ामधील रँकमध्ये अगदी एखाद दुसऱ्या गुणानेही फरक पडू शकतो. त्यामुळे पुनर्मूल्यांकनामध्ये अगदी थोडे गुण वाढले तरीही त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये पुनर्मूल्यांकनानंतर फरक पडला तर त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे बोर्डाने या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल तातडीने द्यावेत अशी मागणी पालक करत आहेत.