राज्यातील एमबीए-एमसीए या व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’चा (सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांप्रमाणे एमबीए-एमसीएस टॉपर जाहीर करणार नसल्याचे परीक्षेचे आयोजक तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले.
राज्यभरातून ४९,२७६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४९,२५२ इतके विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत. २०० पैकी शून्य गुण मिळविणारे २४ विद्यार्थी प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांना ९९.९९ इतके पर्सेटाइल मिळविण्यात यश आले आहे. त्या खालोखाल ९९.९८ इतके पर्सेटाइल मिळविणारे एकूण पाच विद्यार्थी आहेत. गटचर्चेला फाटा देण्यात आल्याने सीईटीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. यंदा प्रथमच संचालनालयाने ऑनलाइन परीक्षा घेतली होती. आधी जाहीर केल्याप्रमाणे या सीईटीचा निकाल १० एप्रिलला जाहीर करण्यात येणार होता, मात्र दोन दिवस आदीच निकाल जाहीर करण्यात संचालनालयाला यश
आले आहे.