कल्याण येथील एम. के. अग्रवाल महाविद्यालयातून ही पेपरफुटी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या महाविद्यालयावर तसेच परीक्षेच्या दिवशी दोन परीक्षा केंद्रांवर जुनीच प्रश्नपत्रिका सोडविण्यात आली होती. याचा तपास करण्यासाठी प्रत्येकी एक समिती नेमण्याचा निर्णय झाला.
शुक्रवार, ४ एप्रिल रोजी विद्यापीठाचा एमएचआरएम या विषयाचा पेपर फुटला होता. ही प्रश्नपत्रिका एम. के. अग्रवाल महाविद्यालयातून पैशांच्या मोबादल्यात देण्यात आल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले असून या प्रकरणी चौघांना अटकही करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर नेमका काय गैरप्रकार घडला हे तपासण्यासाठी दोनसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये डॉ. मधू नायर हे निमंत्रक असतील, तर डॉ. सिद्धेश्वर गडदे हे सदस्य असणार आहेत. ही समिती महाविद्यालयातील परीक्षेशी संबंधित घटकांची चौकशी करून एका आठवडय़ात आपला अहवाल सादर करील.
शुक्रवारी परीक्षा नियंत्रकांना सकाळी १०.१७ च्या दरम्यान पेपरफुटीबाबत माहिती मिळाली. यानंतर विद्यापीठाने तातडीने सर्व महाविद्यालयांना नवी प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत असल्याचे कळविले. मात्र अंधेरी आणि विक्रोळी येथील दोन केंद्रांवर जुनीच प्रश्नपत्रिका देण्यात आली. या केंद्रांवर ६०० हून अधिक विद्यार्थी होते. या केंद्रांवर नेमके काय झाले आणि जुनीच प्रश्नपत्रिका का देण्यात आली, याचा तपास करण्यासाठीही एक समिती नेमण्याचे परीक्षा मंडळात ठरले. या समितीमध्ये डॉ. विजय जोशी हे निमंत्रक असतील, तर डॉ. उषा मुकुंदन या सदस्य असणार आहेत. ही समिती दोन्ही केंद्रांवर भेट देऊन दोन दिवसांमध्ये आपला अहवाल विद्यापीठाला सादर करणार आहे. ही दोन्ही परीक्षा केंद्रे आणि अग्रवाल महाविद्यालयाला विद्यापीठाने आधीच ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली आहे.