सध्याच्या जगात दहावीनंतरच्या शिक्षणाचे इतके पर्याय उपलब्ध आहेत, की कोणता मार्ग आपल्यासाठी योग्य आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना हमखास सतावतो. मग त्या संभ्रमावस्थेतच सर्वमान्य वाटांवरून पावले टाकली जातात; पण अनेकदा अपेक्षित असे यश मिळतच नाही. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असलेली ही संभ्रमावस्था दूर करून उज्ज्वल करिअरसाठी नियोजनपूर्वक पावले टाकली जावीत, यासाठी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘मार्ग यशाचा’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणाऱ्या या परिषदेत अनेक मान्यवर तज्ज्ञ करिअरविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
व्हीआयटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि विद्यालंकार यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या परिषदेत अभ्यासपूर्ण चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते गुरुवारी या परिषदेचे उद्घाटन होईल. गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी पहिल्या सत्रात डॉ. हरीश शेट्टी ‘अभ्यास व करिअरसंबंधी ताणतणावांचा सामना कसा करावा’ हा विषय मांडणार आहेत. त्यानंतर ‘पाल्याच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका कोणती?’ या विषयावर मिथिला दळवी बोलतील, तर शेवटच्या सत्रात ग्रोथ सेंटरच्या करिअर समुपदेशक मुग्धा शेटय़े व स्नेहल महाडिक ‘१०वी-१२वीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान या शाळांतील विविध पदवी अभ्यासक्रमांची ओळख’ करून देणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका ठाणे येथे टिपटॉप प्लाझा (तीन हात नाक्याजवळ) आणि विद्यालंकार, ईशान आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरसमोर, गोखले रोड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ५० रुपये दरांत उपलब्ध आहेत.

मुलांच्या करिअरच्या बाबतीत पालक आणि मुले यांनी एकत्र येऊन कसे निर्णय घ्यावेत, करिअरची निवड मुलांनी केल्यानंतर पालकांनी पाठिंबा कसा द्यावा, करिअरच्या बाबतीत येणाऱ्या विविध अडचणींवर मानसिकदृष्टय़ा मात कशी करता येईल, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.
– डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ
****
दहावी-बारावीनंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये खूप विविध पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यांव्यतिरिक्त पर्यायांची चर्चा होणार आहे. तसेच आर्किटेक्चर, मीडिया यांच्यासह इतरही ऑफबिट करिअरबाबत सखोल माहिती या सत्रात घेता येईल.
– मुग्धा शेटय़े, करिअर समुपदेशक, ग्रोथ सेंटर
****
मुलाच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणात पालक खूप रस घेतात. ११वी-१२वी फक्त क्लासची फी भरण्यापुरतीच गुंतवणूक असते, तर डिग्री कॉलेजमध्ये तेवढेही लक्ष नसते; पण मुलाच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यात पालकांनी लक्ष द्यायला हवे, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. अपयश म्हणजे रस्ता संपणे नव्हे, तर ती नव्या रस्त्याची सुरुवात आहे, हा विश्वास पालकांनी द्यायला हवा.
– मिथिला दळवी , शैक्षणिक सल्लागार