News Flash

कोल्हापुरातील वायू प्रदूषणात वाढ

कोल्हापूर जिल्हा पर्यावरणाच्या पटलावर बदनाम झाला

कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या आत्यंतिक प्रदूषणामुळे कोल्हापूर जिल्हा पर्यावरणाच्या पटलावर बदनाम झाला असताना त्यात आता वाढत्या वायू प्रदूषणाची भर पडत चालल्याने करवीरची हवा काजळी आणि काळजी बनत आहे. वाढवणारी नायट्रोजन ऑक्साइड, नाकावाटे जाणारे व संपूर्ण धूलिकण या वायू प्रदूषकांचे प्रमाण कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत वाढत आहे. या हवा प्रदूषणाचा जनजीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधन, तपासणी अहवालातून सिद्ध झाले असतानाही याबाबत कारवाई होताना दिसत नाही.

कोल्हापूर म्हणजे हिरवाईने नटलेले शहर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिल्ह्यात पाऊसमान पुष्कळ असल्याने धरणे, नद्या बारमाही वाहत असल्याने येथील आल्हाददायक वातावरण असल्याने अनेक जण निवृत्तीनंतर येथेच राहण्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे, जिल्ह्यातील कृषी-औद्योगिक क्रांतीमुळे कामासाठी येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले. शहराचा विस्तार झाला, पण तो होईल तसतसा प्रदूषणाचा टक्का वाढत चालला आहे. जल प्रदूषणात कोल्हापूरची प्रतिमा मलिन झाली असताना शासनाने जाहीर केलेल्या १७ प्रमुख हवा प्रदूषित जिल्ह्यात कोल्हापूरचा क्रमांक अव्वल ठरला आहे. या शहरासाठी ही धोक्याची घंटा आहे.

कोल्हापुरातील वाढत्या वायू प्रदूषणाची दखल घेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने  शिवाजी विद्यापीठ, दाभोलकर कॉर्नर, महाद्वार रोड या परिसरातील एक दिवस आड याप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत स्पेराईटरी डस्ट सॅम्पलर (आरडीएस) यंत्राद्वारे हवेचे सव्‍‌र्हेक्षण केले. यामध्ये दिसलेले चित्र चिंता वाढवणारे ठरले होते. पर्यावरणाची टिमटिम वाजवणाऱ्या शिवाजी  विद्यापीठासह अन्य ठिकाणच्या परिसरातील हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढलेले दिसले. यात नायट्रोजन ऑक्साइड, नाकावाटे जाणारे धूलिकण मोठय़ा प्रमाणात आढळले. हे प्रमाण मानकांपेक्षा तिपटीने जास्त आढळले. शिवाय प्राणवायू व कार्बनच्या प्रमाणातील व्यस्तपणा वेगाने वाढत असल्याचे विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी स्पष्ट केले होते. वायू प्रदूषणात वाढलेली मात्रा आरोग्यास घातक आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये दमा, अस्थमा यांसारखे विकार वाढत आहेत. हे रोखण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, ऊर्जास्रोतांचा कमीत कमी वापर, वृक्षारोपण व संवर्धनावर भर देण्याची गरज असल्याचा सल्ला देण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले.

पर्यावरण अहवालात चिंता

शहराच्या विकासाची गती प्रदूषणाच्या मुळावर येत आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात यावर स्पष्ट भाष्य करण्यात आले आहे. फौंड्री – इंजिनियिरग उद्योग, उसाचे पाचट पेटवणे, वाहनांच्या संख्येतील वाढ, वाढती बांधकामे, शहर परिसरातील दगडांच्या खाणी, चुनाभट्टी, घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे, उत्खनन याचा परिणाम हवेवर झाला असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली. परिणामी, शहरवासीयांना अस्थमा, हिमोग्लाबिनचे प्रमाण कमी होणे, वेगवेगळ्या अ‍ॅलर्जी, फुफ्फुसाचे आजार, डोळ्यांच्या विकाराला सामारे जावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:43 am

Web Title: air pollution increase in kolhapur
Next Stories
1 कागल शहर संवेदनशील म्हणून जाहीर करावे
2 निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर; ७ कर्मचाऱ्यांना नोटिसा
3 चलन चणचणीवर ‘माणदेशी’उपाय
Just Now!
X