पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजमितीला वृक्ष लागवडीची गरज असताना इचलकरंजी शहरात मात्र राजरोसपणे वृक्षांची कत्तल करण्याची मोहीमच उघडली आहे. त्यातच छ. शिवाजी पुतळा परिसरात केवळ फांद्या तोडण्याची आवश्यकता असताना संपूर्ण वृक्षच तोडून पालिका प्रशासनाने जणू अकलेचे तारेच तोडले आहेत. दरम्यान, हा वृक्ष कोणत्या कारणासाठी तोडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एका अधिकाऱ्याने तरु कमिटीची मंजुरी आता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर वृक्षाचा वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना हे झाड तोडणाऱ्यांवर आणि त्यास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई होणार काय असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करूनही दिवसभर इचलकरंजी पालिकेतील अधिकारी फिरकले नाहीत. हे काम दिवसभर सुरू असल्याने भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता.
येथील छ. शिवाजी पुतळा परिसरातील एका व्यावसायिकाने आपल्या दुकानसमोर असलेल्या झाडाच्या धोकादायक ठरत असलेल्या फांद्या तोडण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. त्यावर नगराध्यक्षांनी उपमुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात, ‘अर्जदाराच्या मागणीनुसार सदरचे धोकादायक झाड तोडणेस मंजुरी देत तरु समितीची कार्योत्तर मंजुरी घेण्यात यावी,’ असा शेरा मारला आहे. मात्र तरु समितीची मंजुरी न घेता आणि केवळ फांद्या तोडण्याची मागणी असताना संपूर्ण वृक्षावरच घाव घालण्यात आला.