न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिपालिका या तीन स्तंभांच्या आधारावर लोकशाही व्यवस्था कार्य करत आहे. अन्य संस्थांच्या संदर्भात विश्वासार्हतेविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना सामान्य नागरिकांचा विश्वास केवळ न्यायव्यवस्थेवर टिकून आहे. न्यायव्यवस्थेसमोर हा विश्वास वृद्धिंगत करण्याचे आव्हान उभे आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
कसबा बावडा रोडवर अतिशय आकर्षक अशी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यात आली आहे. या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी फडणवीस म्हणाले, जागतिक आíथक महासत्ता म्हणून भारत देश पुढे येत आहे. यासाठी गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार निर्मितीही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य अशी व्यवस्था स्थापन करण्यात न्यायपालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी सामाजिक न्यायाचं पर्व कोल्हापुरात सुरू केले असा उल्लेख करून फडणवीस म्हणले, यामुळे  एकतेच्या, सामाजिक न्यायाच्या, नसíगक न्यायाच्या कामात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहिले. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाची इमारत अतिशय सुंदर उभी केली असून, चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. या न्यायसंकुलातून समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीशांबरोबरच पक्षकार आणि वकील हे घटकही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून श्रीमती ताहिलरमाणी म्हणाल्या, न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये सदैव विश्वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण असणे गरजेचे आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला जलद आणि योग्य न्याय मिळणे सोईचे होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कोर्ट, पेपरलेस कोर्ट संकल्पनेला मूर्त रुप देण्याकरिता सर्व व्यवस्था या न्याय संकुलात करण्यात आली असून, यामुळे न्यायदानाच्या घटकाला समुचित न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.