गोंधळ, घोषणाबाजी, समांतर सभा

सतेज पाटील व महादेवराव महाडिक या आजी-माजी आमदारातील वादाचे जोरदार पडसाद गुरुवारी झालेल्या येथील राजाराम साखर कारखान्याच्या वार्षकि सभेत उमटले. तणावग्रस्त वातावरण, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आणि प्रचंड गोंधळाच्या वातावरणात राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षकि सभा अवघ्या ३० मिनिटात गुंडाळली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने होते. सत्तारूढ गटाची सर्व सूत्रे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतली होती.

कारखान्याच्या वार्षकि सभेचे वातावरण कारखाना परिसरात जाणवत होते. सभेचे प्रत्यक्ष कामकाज ठरल्या वेळेत सकाळी ११ वाजता सरू झाले. माने यांनी सर्वाचे स्वागत केले. त्यानंतर महाडिक यांनी सुरुवातीस कारखान्याच्या प्रगतीबरोबर सहकारी साखर कारखान्यासमोरील असणारी आव्हाने स्पष्ट केली. शासनाच्या नियमानुसार सभासदांची सर्व देणी दिली असल्याचे सांगितले. आजच्या सभेतील सर्व प्रश्नांची उत्तरे आपणच देणार असल्याचे सांगितले.

विरोधी गटाचे तानाजी चव्हाण यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताच सभेत गोंधळ सुरू झाला. इतर प्रश्न मांडण्याअगोदरच दोन्ही बाजूच्या समर्थकात मोठय़ा घोषणा सुरू होऊन अहवालातील सर्व विषय मंजूर म्हणत राष्ट्रगीत सुरू केले. लगेचच आभार मानून सत्तारूढ गटाने सभा संपल्याचे जाहीर केले.

दोन्ही बाजूचे सभासद सभागृह न सोडताच जोरजोरात मंजूर-नामंजूर घोषणा देत होते. हा गोंधळ सुरू असताना आमदार  महाडिक यांच्यासह सर्व समर्थक सभागृहातून बाहेर जाऊ लागताच विरोधी गटाचे कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर घोषणा देत कारखाना प्रवेशद्वारासमोर समांतर सभा घेतली. माजी अध्यक्ष विश्वास नेजदार म्हणाले. कारखान्यावर १४८ कोटी रुपये कर्ज असताना सहवीज प्रकल्प व विस्तारीकरण का केले जात आहे. वाढीव सभासद करण्याकरिता पोटनियम दुरुस्तीचा घाट घातला आहे. तो सभासदांनं हाणून पाडावा, असे आवाहन केले. माजी अध्यक्ष भगवान पोवार यांचे चिरंजीव दिलीप पोवार यांनी या सभेत सांगितले, की कारखान्याच्या नियमानुसार वेळेत १५ प्रश्न उपस्थित केले होते. त्यापकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे. यावेळी दोन्ही गटांचे समर्थक आमने-सामने घोषणा देत होते.