दयानंद लिपारे

करोना संसर्ग वाढल्यानंतर दक्षतेचे उपाय म्हणून मुखपट्टी हा प्रमुख घटक ठरला. सध्या मानवी जीवनशैलीचाच एक भाग बनलेल्या या मुखपट्टीमध्ये ‘एन ९५’ या नावाला त्याच्या प्रमाणित दर्जामुळे मोठे महत्त्व आले आहे. याचाच गैरफायदा घेत सध्या या नावाशी साधर्म्य असणाऱ्या किंवा एकसारख्या दिसणाऱ्या मुखपट्टय़ांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. सामान्य दर्जा असलेल्या या मुखपट्टय़ांची विक्री मात्र ‘एन ९५’दराने होत आहे.

करोना संसर्ग अवतरला त्या वेळी सर्वप्रथम चर्चेत आली ती मुखपट्टी (मास्क). करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने मुखपट्टी लावण्याचे आदेश निघाले आणि या ‘मास्क’चीही बाजारपेठ तयार होऊ लागली. यामध्ये अगदी साध्या कापडी मुखपट्टीपासून ते विषाणूरोधक म्हणून प्रमाणित अशा ‘एन ९५’ पर्यंत या अनेक प्रकारच्या मुखपट्टय़ांची निर्मिती, खरेदीविक्री वाढली. यामध्येच जास्तीतजास्त सुरक्षित म्हणून चर्चेत आलेल्या ‘एन ९५’ या मुखपट्टीस मोठी मागणी आहे. जिथे या विषाणूचा अधिक धोका आहे, अशाठिकाणी ही ‘एन ९५’ मुखपट्टी वापरण्यास सुचविण्यात आले. या साऱ्यामुळे ‘एन ९५’ मुखपट्टीबद्दल सुरुवातीपासून सामान्य जनतेमध्येही एक सुप्त आकर्षण तयार झाले आणि याच्या मागणीतही मोठी वाढ झाली. याचाच गैरफायदा घेत ही बनावटगिरी वाढली आहे.

मानसिकतेचा फायदा

प्रमाणित ‘एन ९५’ मुखपट्टी बाजारात १५० ते दीड हजार रुपये किमतीला उपलब्ध आहे. साध्या मुखपट्टीपेक्षा ही किंमत खूप मोठी असतानाही तिच्याविषयीच्या खात्रीमुळे ‘एन ९५’ची मागणी सतत वाढत गेली. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन काही व्यापाऱ्यांनी या नावाशी साधर्म्य असणाऱ्या किंवा एकसारख्या दिसणाऱ्या मुखपट्टय़ा बनवण्याचा उद्योग थाटला आहे. ‘आर एन ९५’, ‘के एन ९५’ अशा नावाने या मुखपट्टय़ा बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या मुखपट्टय़ा हुबेहूब ‘एन ९५’ सारख्या दिसतात. परंतु यांचा दर्जा ‘एन ९५’ प्रमाणे असतोच असे नाही. पण या बनावट मुखपट्टय़ा ‘एन ९५’ प्रमाणेच महागडय़ा दराने विकल्या जात आहेत. नाव आणि उत्पादनातील साधम्र्यामुळे सामान्य ग्राहकांना मात्र यातील फरक कळत नाही आणि त्यांची फसवणूक होत आहे.

बनावटगिरीचा समांतर बाजार

वैद्यकीय मुखपट्टी तयार करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून प्रमाणीकरण करून घ्यावे लागते. प्रत्यक्ष उत्पादनस्तरावर त्यातील घटकांचे निकष पुढे तंतोतंत पाळले जात नाही. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काटेकोर, पुरेशी नसल्याचा फायदा घेत या अशा बनावट वस्तू बाजारात येतात आणि त्यातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची खंत एका गारमेंट अभ्यासकाने व्यक्त केली.

तक्रार आल्यावर कारवाई

प्रमाणित परवान्यानुसार मुखपट्टीचे उत्पादन केले पाहिजे. त्यातून पळवाटा शोधण्याचा, नियम-निकषांचे उल्लंघन करण्याचा प्रकार कानावर आले आहेत. असे प्रकार निदर्शनास आल्यास किंवा कोणी तक्रार केल्यास संबंधित उत्पादक, विक्रेते यांच्यावर कारवाई केली जाईल.

– एम. एस. पाटील, सहायक संचालक, अन्न व औषध विभाग, कोल्हापूर</p>