चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात जनधन खात्यात अचानक मोठय़ा प्रमाणावर पसा जमा होऊ लागला असल्याचे दिसत आहे. अनेक बँकांच्या पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून या अचानक जमा होणाऱ्या पैशाच्या नोंदी ठेवण्याचे कामही बँकेतर्फे केले जात असून त्यावर प्राप्तिकर खात्याची नजर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रत्येक गरीब व्यक्तीचेदेखील बँकेत खाते असावे या हेतूने ‘जनधन’ योजना आणली. या योजनेनुसार कोल्हापुरात राष्ट्रीय तसेच सहकारी बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नवीन खाती तयार करण्यात आली. या सर्व खात्यांना ‘झिरो बॅलन्स’ची सुविधा देण्यात आलेली आहे.

यातील बहुतांश खात्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कुठलाही व्यवहार झालेले नाही. त्यातील बहुसंख्य खाती ही शून्य पैसे शिलकीची होती. दरम्यान ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर गेल्या दोन- चार दिवसांतच प्रधानमंत्री जनधन योजना, जनसुरक्षा योजना या खात्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर पसा जमा होऊ लागला आहे. जिल्ह्यात या खात्यांत काही कोटी रुपये भरले गेले आहेत. या खात्यावर अचानकपणे मोठय़ा प्रमाणात पैसे जमा होऊ लागल्याची सरकारनेही दखल घेतली असून या खात्यांवर विशेष लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जमा रकमांच्या नोंदी

जनधन खात्यात मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा होत असल्याची कबुली देताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंग चव्हाण म्हणाले, रिजर्व बँकेने या खात्यात पसे भरण्यासाठी कुठलेही बंधन घातलेले नाही. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरताना बँका नियमाप्रमाणे ग्राहकांकडे ओळखीचा पुरावा मागत आहे. कोणी, किती रक्कम भरली याची यादी बँकेने बनवली आहे. प्राप्तिकर खात्यासाठी हे तपशील देण्यात येणार आहेत.

पोलीस यंत्रणा सज्ज

चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर बँकांत ग्राहकांच्या रांगा लागणार हे लक्षात आल्याने जिल्हय़ात प्रत्येक बँकांत पोलीस बंदोबस्त तनात केला आहे. पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द केल्याचे जिल्हाधिकारी अमित सनी यांनी सांगितले. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या पशाच्या दळणवळणावर पोलिसांची करडी नजर आहे.

सराफ लक्ष्यस्थानी

बेकायदा मनीचेंजरचे काम करणारे व बेहिशेबी पशातून सराफ बाजारातून सोने खरेदी करणाऱ्यांवरही प्राप्तिकर विभाग कारवाई करणार आहे. सराफ बाजारातून मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी केल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्याने रविवारी येथील बडय़ा सराफांच्या पेढय़ांवर  प्राप्तिकर विभाग दिवसभर कारवाई करत होता.