हसन मुश्रीफ यांची खासदार धनंजय महाडिक यांच्यावर कुरघोडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत असताना जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांनी उचल खाल्ली आहे. विशेषत: आमदार   हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. महाडिक यांच्या सोयीच्या राजकीय सोयरिकीकडे बोट दाखवत मुश्रीफ यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्रीय पातळीवर सर्व विरोधकांना एका मंचावर आणण्यासाठी कंबर कसलेल्या पवारांना कोल्हापुरातील पक्षांतर्गत मतभेदांवर जालीम उपाययोजना करणे भाग पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजप विरोधातील ठाणे पॅटर्न आकाराला आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हातकणंगले मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रातील आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी ते कोणत्या पक्ष – चिन्हांवर  लढणार याविषयी स्पष्टता नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपकडून निवडणूक लढवल्यास केंद्रात मंत्री करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी महाडिक यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यांच्या सावध पवित्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. हसन मुश्रीफ तर या भूमिकेने भलतेच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी गेली काही महिने महाडिक यांना लक्ष्य केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला महाडिक – आमदार सतेज पाटील यांच्यातील वाद मिटवून महाडिक  यांना विजयी करण्यात मुश्रीफ यांचा पुढाकार होता, तो महाडिक यांनी अनेकदा मान्यही केला आहे. तथापि, महाडिक यांनी भाजपच्या कच्छपी लागणे हे मुश्रीफांना अजिबात मानवलेले नाही.

तुम्ही नेमके कुणाबरोबर?

लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमधील दुभंग रुंदावत चालला आहे. पवारांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मुश्रीफांनी महाडिक यांच्याविरोधात उघड बंड पुकारले आहे. महाडिक दिल्लीत असताना पवारांशी जवळीक साधतात, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात आणि कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या सोबत राहतात. त्यामुळे लोकसभेला मीच उमेदवार असेन, असे विधान कार्यकर्त्यांच्या बैठकीत करून मुश्रीफांनी वादाला फोडणी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहप्रमुख संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याची भाषा करणारे मुश्रीफ आता स्वत:च उमेदवारीवर स्वार होऊ  पाहात असल्याने राजकारण वेगळ्या वळण-वादावर पोहोचले असून यावर शरद पवार कोणती मात्रा देतात याकडे लक्ष वेधले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ या एकेकाळच्या गुरुशिष्याच्या वादामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नुकसान झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मंडलिक यांनी २००९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाचे निशाण रोवले. त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

पवारांसमोर मतभेदाचे दर्शन

गतवर्षी जानेवारीत महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच मुश्रीफ यांनी महाडिक व आपल्यात राजकीय मतभेद असल्याची उघड कबुली दिली होती. महाडिक यांच्याशी आपले राजकीय मतभेद आहेत; पण चांगल्या कामासाठी नेहमी सहकार्य राहील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले होते. पण त्यानंतरही दोघांतील  धुसफुस सातत्याने चव्हाटय़ावर येत राहिली.

वादाचे मूळ निवडणुकीत

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे महाडिक यांचे म्हणणे होते, तर मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीची आघाडी काँग्रेसशी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर पक्ष निरीक्षक दिलीप पाटील यांनी आघाडी समविचारी पक्षाशी करावी लागेल, अशी भूमिका मांडणे भाग पडले. जिल्हा परिषदेत भाजपच्या शौमिका महाडिक यांना अध्यक्ष बनवताना महाडिक यांनी महत्त्वाची भूमिका निभावत मुश्रीफ – सतेज पाटील यांच्या सत्ताकांक्षेला शह  दिला होता. विधान परिषद निवडणुकीतही महाडिक हे काकाच्या पाठीशी राहिल्यानेही मुश्रिफांची नाराजी वाढली.