News Flash

समरजितसिंग घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित

भाजपने पक्षविस्तारासाठी आणखी एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

कागल तालुक्यातील शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचा निर्णय गुरुवारी घेतला असून, २२ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्यापाठोपाठ घाटगे यांना पक्षात घेऊन भाजपने पक्षविस्तारासाठी आणखी एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात घाटगे घराण्याचे महत्त्व खूप आहे. दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्याचा सहकारातील एका मोठा कारखाना म्हणून लौकिक आहे. त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधिीत्व केलेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र समरजितसिंह घाटगे हे कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष वेधले होते.

शाहू कारखान्यावर शाहू जयंतिदिनी म्हणजे २६ जून रोजी झालेल्या एका कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हाच त्यांनी घाटगे यांना पक्षात प्रवेश करण्याविषयी सूचित केले होते. त्यानंतर चर्चा-बठका होत राहिल्या. अखेर बुधवारी वर्षां बंगल्यावर झालेल्या बठकीत समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. त्यांना म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद देण्याचे ठरले असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना संगितले.

राजघराणे भाजपसोबत

राजर्षी शाहूमहाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे यांना राज्यसभेचे सदस्यपद देण्याचा निर्णय घेऊन भाजपने कोल्हापूर जिल्ह्यातील आपला परीघ रुंदावण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहूमहाराज हे मूळचे कागलच्या घाटगे घराण्यातील. याच घाटगे घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशासाठी खासदार संभाजीराजे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. शाहूंचे दोन मातबर वंशज भाजपमध्ये सक्रिय होताना दिसत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:41 am

Web Title: samarjeetsingh ghatge bjp
Next Stories
1 गाळप हंगाम निर्णयाने साखर क्षेत्रास दिलासा
2 कोल्हापूर विमानतळासाठी राज्य शासनाचे ५५ कोटी
3 मुंबई-कोल्हापूर विमानसेवेस मंजुरी
Just Now!
X