News Flash

“वेळ आली तर स्वत:चा बळी देईन पण…”, राजू शेट्टींचं ठरलं

रक्त सांडून मी ही चळवळ उभी केली आहे, राजू शेट्टी आक्रमक

संग्रहित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय मंगळवारी घोषित केला. मात्र यानंतर राजू शेट्टी यांच्यावर विरोधक तसंच स्वकीयांनी टीका सुरु केली होती. यामुळे अखेर राजू शेट्टी यांनी विधान परिषदेची ब्यादच नको, असं म्हणत यावर चर्चा करायचे नाही असं स्पष्ट केलं आहे. यामुळे स्वाभिमानीतील विधानपरिषदचा गुंता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टू यांनी वेळप्रसंगी मी स्वत:चा बळी देईन पण चळवळ वाचवेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “रक्त सांडून मी ही चळवळ उभी केली आहे. ही संघटना संपावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत. त्यांचे मनसूबे पूर्ण होणार नाही. वेळप्रसंगी मी स्वत:चा बळी देईन पण चळवळ वाचवेन”. राजू शेट्टी यांनी फेसबुकवरही एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये ?
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे.

गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच…

शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये.
– राजू शेट्टी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 6:00 pm

Web Title: swabhimani shetkari sanghatna raju shetty on ncp offer for mla post sgy 87
Next Stories
1 राजू शेट्टी यांच्या राजकारणाचे नवे शिवार
2 १५ किलोमीटरचा जलसेतू
3 कोल्हापूर : ‘CAIT’ चिनी वस्तूंवरील बहिष्काराची तीव्रता वाढवणार
Just Now!
X