तबलीग जमातीसाठी कोल्हापुरातून गेलेले २१ मुस्लीम बांधव अद्याप दिल्लीतच आहेत. तेथे ते आरोग्यदृष्टय़ा तंदुरुस्त आहेत, तरीही प्रशासन त्यांच्यावर नजर ठेवून असल्याचे बुधवारी येथे सांगण्यात आले.
तबलीग जमातीतून दिल्लीला कोल्हापुरातील २१ लोक गेले होते. ते अजूनही दिल्ली मध्येच आहेत. ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत. टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच ते कोल्हापुरात येणार आहेत. यापैकी कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे स्पष्टीकरण मुस्लीम बोर्डिगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आज केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही तबलीग जमातीसाठी गेलेले लोक परत आले नसल्याचे सांगितले. त्यांच्या शहरात येण्याच्या प्रवासावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. कोल्हापुरात आल्यावर त्यांची काटेकोर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तबलीग जमाती वा अन्य कारणासाठी दिल्ली वा अन्य भागात कामासाठी कोणी गेले असेल, त्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीतील तिघांचा शोध सुरू
दिल्लीमधील निझामुद्दीन येथे ‘तबलिग जमात’साठी सांगली जिल्ह्य़ातील तिघेजण सहभागी झाल्याचे समजते. या सर्वाचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसून त्यांचा पोलीस सर्वत्र सोध घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्य़ातील पाच रुग्णांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून सद्य:स्थितीमध्ये २५ करोनाबाधित रुग्ण मिरजेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. अद्याप दोन रुग्णांचे अहवाल प्राप्त व्हायचे असल्याचीही माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली.
दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमामध्ये सांगलीतील तिघेजण सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र याबाबत चौकशीनंतरच अधिकृत माहिती दिली जाईल, असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.
करोनाचा प्रादुर्भाव आढळू लागल्यानंतर जिल्ह्य़ामध्ये १ हजार ४३६ जण परदेश प्रवासाहून आले आहेत. यापकी ९१ जणांना आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करून त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापकी २५ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर मिरजेतील करोना कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. ६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापकी पाच जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे मंगळवारी सकाळी आले असून त्या सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आहेत. दोन रुग्णांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. संस्थात्मक क्वोरंटाईनमध्ये ४९ जण दाखल असून यामध्ये मिरजेतील २२ तर इस्लामपूर येथील २७ जण आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या उर्वरित १ हजार २९६ प्रवाशांपकी २४८ जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी आज संपला असून उर्वरित १ हजार ४८ जणांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची पथके तनात करण्यात आली आहेत.