कोल्हापूर: कोल्हापूर काँग्रेसमधील एक गट शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीला मावळत्या सभागृहातील ३४ माजी नगरसेवकांनी हजेरी लावली. काँग्रेससोबत एकनिष्ठपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. तातडीने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची एक बैठक एका हॉटेलमध्ये आयोजित केली होती. त्याला मावळत्या सभागृहातील ३४ सदस्यांनी उपस्थिती लावली. त्यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवून महापालिकेवर सत्ता मिळवली जाईल, असा निर्धार बोलून दाखवला. या सदस्यांची भेट घेऊन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला.

या बैठकीस शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिलीप पोवार हे अनुपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला . काँग्रेससह विरोधकांचा एकही आमदार निवडून आला नाही. त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीने विरोधकांचे गणित पूर्ण बिघडले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा दारुण पराभाव झाला. या निवडणुकीनंतर काँग्रेस बॅकफुटवर गेल्यानंतर जिह्यातील राजकारण ३६० अंशात फिरले. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दहा नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जिल्हा नेतृत्वही अलर्ट झाले. मात्र नाराज असलेल्यांसोबत कोणतीही चर्चा करणार नाही. आतापर्यंत पक्षांने आणि आपण स्वत: त्यांच्यासाठी खूप केले आहे, आता पक्षासाठी करण्याची वेळ त्यांची आहे. 

सत्ता नाही म्हणून कोणी सोडून जात असतील तर खुशाल जावे, अशी आक्रमक भूमीका काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी घेतली. यामुळे नाराजांचे बंड थंड होण्यास मदत झाली. दरम्यान, काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवकांशी संपर्क केला. पक्षासोबत राहण्याची इच्छा असल्यांनी बैठकीला उपस्थित रहावे असा निरोप दिला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीविरोधात बंडाचे निशान फडकवले होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर दहा नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला मावळत्या आणि जुन्या अशा तब्बल ३४ नगरसेवकांनी हजेरी लावली. कोणत्याही स्थितीत पक्ष सोडणार नाही, काँग्रेससोबतच राहून एकदिलाने काम करुन पुन्हा एकदा महापालिकेवर काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.