कोल्हापूर : शब्दाला जागणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे आगामी ६ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे केले जातील, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शुक्रवारी दिली.

 भारतरत्न आंबेडकर पुतळा समितीच्य वतीने जयसिंगपूर येथे बसस्थानकातील जागा पुतळा उभारणीसाठी मागणी केली होती. गुरुवारी एसटी महामंडळाने जागा नगरपरिषदेकडे वर्ग केल्याचे मंजुरी पत्र दिले आणि शुक्रवारी जयंतीचे औचित्य साधून या जागेवर डॉ. आंबेडकर पुतळा भूमिपूजन झाले. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

 राजकारणाच्या वेळी ते केले जावे. विधायक कामा वेळी एकत्र येण्याची परंपरा शिरोळ तालुक्याने अनेक वर्ष पाहिली आहे. अलीकडे चांगल्या कामात आडकाठी आणण्याचा प्रकार वेदनादायी आहे, असा उल्लेख करून आमदार पाटील यांनी अडीच वर्षात ९०० कोटी रुपयांचा निधी तालुक्याच्या विकासासाठी आणल्याचा आनंद आहे. केवळ राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींना याच्या वेदना होत आहेत ही बाब दुर्दैवी आहे,अशी टीका केली.

 स्वागत बी. आर. कांबळे यांनी केले. जागा मंजूर झाल्याबद्दल पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार यांचा सत्कार करण्यात आला. वंचित आघाडीचे प्रमुख उत्तम वाघवेकर यांनी आभार मानले. माजी नगराध्यक्ष बबन हातळगे, संभाजी मोरे, राजेंद्र झेले, शैलेश आडके, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, यांच्यासह आंबेडकरवादी विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.