दयानंद लिपारे

राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायातील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोना होण्यास कोंबडय़ा कारणीभूत असल्याचा गैरसमज निर्माण झाल्यानंतर त्यांचे दर घसरणीला लागले. परंतु परिस्थिती सुधारत असताना कोंबडय़ांच्या खाद्याचा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. संचारबंदीमुळे पशुखाद्याची निर्मिती ठप्प झाली ते मिळणे कठीण झाले आहे. पशुखाद्याअभावी लाखो कोंबडय़ांवर संक्रांत आली आहे.

शेतीबरोबर ग्रामीण भागात पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. राज्यात हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे. अंडी निर्मिती आणि मांस (चिकन) अशा दोन्ही प्रकारे हा व्यवसाय केला जातो. चिकन विक्रीसाठी ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला जातो. त्यासाठी नामांकित बडय़ा हॅचरीज कंपन्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांशी करार केले आहेत. त्यानुसार या कंपन्या कुक्कुटपालन चालकांना पशुखाद्य, औषधे याचा पुरवठा करतात. वैद्यकीय तपासणी केली जाते. पोल्ट्रीचालक केवळ कोंबडय़ांना वाढवतात. ४५ दिवसांनंतर किलोला ठरलेल्या दराप्रमाणे विक्री केली जाते. यातून कुक्कुटपालन व्यावसायिक आणि कंपन्या या दोघांना आर्थिक लाभ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात स्थिरावला आहे.

अडचणींची मालिका

हा जोडधंदा चांगल्या प्रकारे सुरू असताना महिनाभरापासून एकामागून एक अडचणी निर्माण होत आहेत. करोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर त्याचा पहिला आर्थिक फटका बसला कुक्कुटपालन व्यवसायाला. चिकन खाल्ल्यामुळे करोनाचा संसर्ग होतो, अशी अफवा पसरल्याने चिकन विक्रीवर संक्रांत कोसळली. काहींनी कोंबडय़ा मरण्यापेक्षा मोफत वाटल्या, तर काहींनी १०० रुपयांना पाच अशा नगण्य किमतीला विकल्या.

अमेरिकेसह काही देशांतून चिकन, विशेषत: गोठवलेल्या पायांच्या तुकडय़ांना (लेग पीस) आयात करण्यास परवानगी देण्यास तीव्र विरोध होत आहे. त्यातून भारतीय पोल्ट्री उद्योगचे अंदाजे एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. शासनाने करोना होण्यास चिकन कारणीभूत नाही असे स्पष्टीकरण केल्याने आणि मटणाची उपलब्धता कमी झाल्याने ग्राहक पुन्हा चिकन घेण्यासाठी दुकानांसमोर दिसू लागले होते.

पशुखाद्य निर्मितीत अडचणी

आता पुन्हा एकदा कुक्कुटपालन व्यवसायासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. पशुखाद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘पशुखाद्य निर्मितीसाठी प्रामुख्याने मका, सोयाबिन आणि काही औषधांचा वापर केला जातो. हा कच्चा माल मुख्यत्वेकरून दक्षिणेकडील राज्यांतून येतो. आता तेथील गोदामे बंद असल्याने या मालाचा पुरवठा होऊ शकत नाही,’ असे वेंकीज कंपनीचे कोल्हापूरचे प्रभारी शशिकांत पाटील यांनी सांगितले. केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ांत या कंपनीचा आठवडय़ाला ७०० टन पशुखाद्य पुरवठा केला जातो. याशिवाय प्रीमियम, सगुना, जाफा, नंदा, व्हीआरके यासह सह अन्य काही स्थानिक कंपन्याही पशुखाद्य पुरवठा करतात. आता या सर्वाचाच पशुखाद्य पुरवठा थांबला आहे. दुसरीकडे, पशुखाद्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमधील कामगार मूळ गावी परतल्याने उत्पादन थांबल्यात जमा आहे. पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या समोर खाद्याची निर्मिती कशी करायची याचा पेच आहे.

कोंबडय़ांची उपासमार

शेतकऱ्यांनी, कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कंपन्यांशी करार केले आहेत. संचारबंदी सुरू असल्यामुळे कंपन्यांची पशुखाद्याची निर्मिती थंडावली आहे. पशुखाद्याचा साठा संपल्याने कोंबडय़ांना कोणते खाद्य द्यावे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. ‘खाद्य नसल्याने कोंबडय़ा एकमेकींना चोच मारून जीव घेत आहेत, असे कुक्कुटपालन व्यावसायिक ताजुद्दिन मुजावर यांनी सांगितले. मुख्य म्हणजे उपासमारीने कोंबडय़ा दगावू लागल्याने दुर्गंधी पसरत आहे. मृत कोंबडय़ांची विल्हेवाट कशी लावायची असाही नवा प्रश्न निर्माण झाला असून ही समस्या सोडवण्याची मागणी व्यावसायिक करीत आहेत.

कोंबडय़ांची उपासमार

शेतकऱ्यांनी, कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कंपन्यांशी करार केले आहेत. संचारबंदी सुरू असल्यामुळे कंपन्यांची पशुखाद्याची निर्मिती थंडावली आहे. पशुखाद्याचा साठा संपल्याने कोंबडय़ांना कोणते खाद्य द्यावे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. ‘खाद्य नसल्याने कोंबडय़ा एकमेकींना चोच मारून जीव घेत आहेत, असे कुक्कुटपालन व्यावसायिक ताजुद्दिन मुजावर यांनी सांगितले. मुख्य म्हणजे उपासमारीने कोंबडय़ा दगावू लागल्याने दुर्गंधी पसरत आहे. मृत कोंबडय़ांची विल्हेवाट कशी लावायची असाही नवा प्रश्न निर्माण झाला असून ही समस्या सोडवण्याची मागणी व्यावसायिक करीत आहेत.