कोल्हापूर: पत्नीच्या चरित्राचा संशय घेऊन सासू, पत्नी, मेव्हणा, मेहुणी या चौघांचा खून केल्याप्रकरणी आरोपीला मंगळवारी जयसिंगपूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ३५,रा.  मूळ कवठे गुलंद, शिरोळ, सध्या यड्राव ) असे आरोपीचे नाव आहे.

प्रदीप व त्याची पत्नी रूपाली यांच्यात नेहमी भांडणे होत असत. प्रदीपला पत्नीच्या चरित्राचा संशय होता. त्यावरून ६ ओटोम्बर २०१८ रोजी रात्री दीड वाजता दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर तो पुन्हा पहाटे चार वाजता घरी आला. त्याने मागाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया आयरेकर, पत्नी रूपाली, मेहुणी सोनाली अभिजीत रावण, मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर यांना डोक्यात मारहाण केली. त्यामध्ये पत्नी व मेहुणा जागीच मृत्यू पावले. सासू  व मेहुणी या सांगली येथे उपचार घेत असताना मृत्यू पावल्या.

हेही वाचा >>>शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख

न्या. गिरीश गुरव यांनी वरील प्रमाणे निकाल दिला. जयसिंगपूर न्यायालयात फाशीची शिक्षा होण्याची ही पहिली घटना आहे. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पहिले. प्राथमिक तपास आय. एस. पाटील , पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी तर पूर्ण तपास  एस. ए. हारुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांनी केला. कोर्ट पैरवी सतीश अरुण कांबळे शहापूर पोलीस ठाणे हे होते.