भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात युती होण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करूनही केंद्र व राज्याचा सत्तेत एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत आमने-सामने ठाकणार आहेत. जागावाटपात एकमत न झाल्याने हा कटू निर्णय उभय पक्षांना घ्यावा लागला आहे. जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दिली. जिल्हा परिषदेच्या २२ आणि पंचायत समितीच्या ४४ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचा मत्रीपूर्ण लढतीचा पर्याय नाकारत त्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे संकेत स्थानिक नेत्यांना दिले आहेत.

भाजपा व मित्रपक्षात जागावाटपाबाबत शुक्रवारी  बैठक झाली असता  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २२ जिल्हा परिषद मतदारसंघ मिळावेत, ही जुनीच मागणी लावून धरली होती. इतक्या जागा भाजपाला सोडणे शक्य नव्हते. भाजपाने ७-८ जागा देण्याची तयारी दाखवली पण याला शेट्टी राजी झाले नाहीत. अखेर शेट्टी यांनी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांना जागा वाटपाबाबत जमणार नाही, असे सांगितले. एकंदरीत घडामोडी पाहता कालच वेगळी चूल मांडण्याचे संकेत खासदार राजू शेट्टी यांनी दिले. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. शेट्टी यांची भूमिका लक्षात आल्यावर भाजपाने त्यांच्यासाठी सोडवायच्या जागेवर कोणाला उभे करायचे याचे डावपेच आखण्यास सुरुवात केली.

जागावाटपाबाबत मतक्य होत नसेल तर काही ठिकाणी मत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला, पण तोही शेट्टी यांनी धुडकावून लावला. लढायचे तर ते उघड, त्यात मत्रीचा आडपडदा कशाला, असे सांगत असला दांभिकपणा आपल्याला जमत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले.

शेट्टी – खोत यांची कसोटी

स्वाभिमानी स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले असले तरी त्यातून काही प्रश्नांना भिडावे लागणार आहे. दोन्ही काँग्रेससह त्यांचा थेट सामना भाजपच्या उमेदवारशीही होणार आहे. या वेळी शेट्टी यांच्या बरोबरीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे कोणता राग आळवणार तसेच स्थानिक आघाडी नेमकी कोणाबरोबर होणार असे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होणार आहेत.