कोल्हापूर : मदरशामधून पळून जाण्यासाठी कारण शोधणाऱ्या एका बालकाने दुसऱ्या बालकास विजेचा धक्का देऊन जिवे मारल्याची घटना हातकणंगले तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळी सुरू होती. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की आळते येथे एक मदरसा आहे. त्यामध्ये मूळचा बिहार राज्यातील रामपूर जिल्ह्यातील एक १४ वर्षीय मुलगा शिक्षण घेत होता. तर तेथेच बिहार राज्यातील ११ वर्षीय आणखी एक मुलगा शिक्षण घेत होता. या अकरा वर्षीय मुलास मदरशातून पळून जायचे होते. त्यासाठी मदरशाला सुटी मिळणारे कारण शोधत होता. त्यातून त्याने १४ वर्षीय बालकास विजेचा शॉक देऊन मारले. ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये चित्रीत झाली आहे. संस्थेतील मौलवींनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यावर याबाबत तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.