गॅसदाहिनीवरून नगरसेवकांचे प्रशासनावर ताशेरे

मृत्यूनंतर होणारी शवाची परवड आणि उद्यानांची दुरवस्था या दोन परस्परविरोधी मुद्यांवर महापालिकेच्या बुधवारच्या सभेमध्ये नगरसेवकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. शहरातील उद्याने, खेळाची मदाने व मोकळय़ा जागा दत्तक तत्त्वावर देण्याचा विषय सभेत नामंजूर करण्यात आला.

स्मशानभूमीत मृतदेह दहनासाठी गॅसदाहिनी बसवण्याबाबत दाखल केलेला प्रस्ताव प्राथमिक मंजुरीसाठी होता, पण त्याबाबत आवश्यक माहिती सभागृहात दाखल केली नसल्याबद्दल नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले. प्रेतदहनासाठी सध्याची पारंपरिक लाकूड व शेणी वापरण्याच्या पद्धतीला पर्याय म्हणून गॅसदाहिनी आणणे योग्य असले तरी काही शहरांत विद्युतदाहिनीचाही वापर होतो. विद्युतदाहिनीमुळे वीजपुरवठा खंडित होणे, तसेच दहनापूर्वी मशिन कार्यरत ठेवावी लागते. पर्यायी जनरेटर व्यवस्था करावी लागते. म्हणून गॅसदाहिनीचा प्रस्ताव दिला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

भूपाल शेटे यांनी यापूर्वी डिझेलदाहिनीचा प्रयोग कसा अपयशी ठरला ते सांगितले. पूर्ण अभ्यासाअंती प्रस्ताव देण्याची सूचना केली. महापालिकेत उद्यान विभाग आहे. अधिकारी आहेत. पण शहरातील एकही बाग सुस्थितीत नाही. मग अधिकारी नेमके काय करतात, असा सवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी करून शहरातील सर्व बागा महापालिकेच्या वतीने सुशोभित कराव्यात, अशी सूचना केली.

शहरातील उद्याने, खेळाची मदाने व मोकळय़ा जागा दत्तक तत्त्वावर देण्याचा विषय सभेत नामंजूर करण्यात आला. त्याबाबत चर्चा करताना अशोक पाटील म्हणाले, की ‘दत्तक’ या गोंडस नावाखाली ताब्यात जाणाऱ्या या जागांचा वापर कसा होईल हे सांगता येत नाही. तसेच त्याचा अधिकार महापालिकेकडे राहील याची शाश्वती नाही. भूपाल शेटे म्हणाले, की दत्तक म्हणून दिलेल्या जागा महपालिकेने विकल्या अशी चर्चा होईल. शारंगधर देशमुख म्हणाले, की नेमके कशा पद्धतीने देणार याबाबत माहिती द्यावी. आयुक्त पी. शिवशंकर यांनी उद्यानामध्ये केवळ काही कंपन्या आपल्या कंपन्यांच्या नावाचा फक्त छोटासा फलक लावणार आहेत व उद्यानाची देखभाल करणार आहेत. यामध्ये कोणताही पसे मिळवण्याचा हेतू नाही.

देशमुख यांनी शहरात सध्या एकही उद्यान कुटुंबासह फिरावे किंवा पर्यटकांनी भेट द्यावी असे नाही. महाापलिकेच्या वतीने स्वत:हून उद्यान विकासाचा आराखडा का केला जात नाही. शहरातील महावीर किंवा हुतात्मा गार्डन मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी आराखडा करावा.

प्रा. जयंत पाटील यांनी उद्यान अधीक्षक बी. ई. सिव्हिल आहेत. त्यांचा उद्यान किंवा वनस्पतीबाबत काय संबंध येतो, असा प्रश्न केला व महापालिकेत एमएस्सी अ‍ॅग्री असलेले दोन वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे कार्यभार का देत नाही, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा अशी सूचना केली. यावरून महापालिकेच्या कारभाराबाबत थेट आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.