कोल्हापूर : अतिवृष्टीच्या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली. येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मातोश्री सोडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले हे बरं वाटले. त्यांनी नुकसानीच्या पाहणीचे अहवाल पाहणे महत्त्वाचे आहे. सगळ्याच बाबी नकारात्मक पद्धतीने बघणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. विकासावर केलेले त्यांचे एक तरी भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, निवडणुकीला आम्ही एकसंघपणे सामोरे जाऊ. तिन्ही पक्ष आपापल्या परीने स्थानिक स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील. कोठे युती झाली नाही तर निवडणुकीनंतर युती होईल. या निवडणुकीत महायुतीलाच मोठ यश मिळेल. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेबाबत फडणवीस म्हणाले, त्यांना एकच उत्तर हवे आहे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकलणे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज साडेदहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचेही यावेळी आगमन झाले. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मुख्यमंत्री महोदयांसोबत आगमन झाले.

जिल्हा प्रशासनामार्फत विमानतळावर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.