दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे मतदारराजाची चांगलीच बडदास्त ठेवली जात आहे. यामध्ये आचारसंहितेच्या नियमाची अडचण येत असल्याने उमेदवारांनी मतदारांना सीमावर्ती भागात नेऊन चोचले पुरवले जात आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील काही जिल्हे तसेच गोवा राज्यांतील हॉटेल, ढाबे, बार यामध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी रेंगाळत असताना दिसत आहे. या व्यावसायिकांचे यामध्ये चांगभलं झाले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अटीतटीचा संघर्ष सुरू झाला आहे. साहजिकच मतदारांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. मतदारांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. याचवेळी मतदारांची मर्जी राखण्याकडेही लक्ष पुरवणारी यंत्रणा सतर्क झाली आहे. मतदारांच्या भोजनावळीची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. तथापि यामध्ये निवडणूक आचारसंहितेच्या नियमामुळे रात्री १० वाजण्यापूर्वी हॉटेल, ढाबे, बार बंद करावे लागत आहेत. यावेळेत सामिष भोजनावळी आटोपणे कठीण होत आहे.

कोल्हापूर भागात गर्दी

याला पर्याय म्हणून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांना सीमावर्ती भागातील महाराष्ट्र, गोवा राज्यात नेऊन त्यांचे चोचले पुरवायला सुरुवात केली आहे. बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर, निपाणी, यमकनमर्डी येथील मतदार चंदगड, गडिहग्लज, आजरा, कागल, शिरोळ, इचलकरंजीतील हॉटेल, ढाबे, बारमध्ये रात्री उशिरापर्यंत मजा करताना दिसत आहेत. येथे तसे वेळेचे बंधन काटेकोर नाही.

कोल्हापूर ते लातूर..

अशीच परिस्थिती दक्षिण महाराष्ट्र – उत्तर कर्नाटक लगतच्या भागात दिसते. सीमालढय़ाच्या घोषणेत असणारे बेळगाव, विजापूर, गुलबर्गा,बिदर हे कर्नाटकातील जिल्हे आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाडय़ातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा मोठा भूभाग भाग खेटून आहे. यामुळे कर्नाटकातील मतदारांची या भागातील हॉटेल, ढाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत रंगतदार पार्टी सुरू असते. त्यामुळे महाराष्ट्रातील या व्यावसायिकांना बरे दिवस आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील काही भागापासून गोवा राज्य जवळ असल्याने तेथे नेऊनही अनेक गुलछबुंची रंगेल मर्जी राखली जात आहे. एका अर्थाने कर्नाटकातील सर्वपक्षीय उमेदवार आणि त्यांच्या मतदारांना महाराष्ट्रातील सीमावर्ती भाग हा चैनीसाठी का असेना पण आधार ठरला आहे.

शासन यंत्रणा सतर्क

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीची दखल घेऊन कर्नाटक – महाराष्ट्र सीमावर्ती भागात तपासणी नाके सुरू केले आहेत. दोन्ही राज्यांचे सीमेवर नाकेबंदी करण्यात आली असून पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांची गस्त वाढली आहे. संशयितांची धरपकड केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक काळात एकीकडे धाबा संस्कृती बोकाळली असताना दुसरीकडे प्रशासन, पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचेही दिसत आहे.