कोल्हापूर : मागील हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता न देता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चालवण्यास घेतलेल्या घोडावत गुळ पावडर कारखान्याची ऊस तोड आंदोलन अंकुश या संघटनेने सोमवारी रोखली. यातून पोलिस व आंदोलक यांच्यात काही काळ झटापट झाली. तर, कागल तालुक्यातील शाहू छत्रपती साखर कारखान्यांची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कणेरी मठ परिसरात रोखली. वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना ऊस शेतात परत घेऊन जाण्याबाबत सुनावले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामासाठी प्रति टन २०० रुपये व चालू वर्षाची पहिली उचल ४ हजार रुपये दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे. परंतु,चिपरी येथील घोडावत जॅगरी कारखान्याने ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच आंदोलन अंकुश संघटनेचे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, अमोल गावडे, संभाजी शिंदे, बिरू पुजारी, धनाजी माने, संभाजी निंबाळकर, अनिल हुपरीकर, शिवाजी काळे, बंटी माळी आदी कार्यकर्ते गेले.
त्यांनी मागील हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता न देता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व्यवस्थापनाला विचारणा करीत कारखान्याकडे जाणारा ऊस रोखला. त्यांनी तो परत शेताकडे पाठवला. नंतर कार्यकर्त्यांनी गुळ कारखान्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यातून व्यवस्थापन आणि आंदोलक यांच्यात मतभेद झाले. पोलिस व आंदोलक यांच्यात झटापट झाली.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ऊस दराचा प्रश्न संपेपर्यंत कारखाना बंद ठेवणे आवश्यक होते. त्यांनीच आपला कारखाना चालू केला केल्याने त्यांचा घोडावत खांडसरी कारखाना बंद पाडला. मागील हंगामाचे २०० रुपये मिळेपर्यंत कारखान्याचे दरवाजा बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
चुडमुंगे म्हणाले, ‘आंदोलन अंकुश’ने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आहे. कारखान्यांच्या आमिषाला आम्ही कधीही बळी पडलो नाही. साखरेचे दर व उपपदार्थांचे दर उच्चांकी मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उसालाही यावर्षीची पहिली उचल चार हजार रुपये जाहीर करावी. तसेच गेल्या वर्षीचे दोनशे रुपये तत्काळ द्यावेत, अन्यथा उसाला कोयता लावू देणार नाही.
