कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने डिबेंचर बाबत तपशीलवार चर्चा प्रश्न एकदाच काय तो संपुष्टात आणावा. या प्रश्नावर काल गोकुळ दूध संघावर आलेला मोर्चा हृदयावर छिद्र निर्माण करणारा होता, अशी सल गोकुळचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे आज बोलताना व्यक्त केली.गोकुळतर्फे (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
गोकुळ दूध संघाने दूध संस्थांना द्यावयाच्या डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. या प्रश्नावरून दूध संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत. यातून गोकुळ समोर चार दिवसापूर्वी दूध उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. तर काल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळवर धडक मोर्चा काढला होता. यावेळी महाडिक व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी डिबेंचरवरून संचालक मंडळावर प्रश्नांचा मारा केला होता. या मोर्चाची चर्चा होत असताना आज गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफ, गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावर डिबेंचर मुद्द्यावर केलेले आंदोलन व मोर्चा याचा मोठा प्रभाव दिसून आला. हाच मुद्दा मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात उदृक्त केला. ते म्हणाले , डिबेंचर देण्याची पद्धत गोकुळची जुनी आहे.
डिबेंचर देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित करण्याचा प्रयत्न असतो. यावेळी डिबेंचर मध्ये कपात का करण्यात आली, हा मुद्दा आंदोलकांनी समजून घेतलेल्या नाही. वास्तविक गोकुळ दूध संघाला विकासाची मोठ्या प्रमाणात कामे करायचे आहेत. यासाठी निधीची गरज असल्याने डिबेंचर मध्ये कपात केली असली तरी त्याचा व्याजाचा लाभ दूध उत्पादकांना मिळणार आहे. मात्र हा मुद्दा समजून न घेता आंदोलने केली जात आहेत.
डिबेंचर प्रश्नावरून आंदोलन होत असल्याने गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने या प्रश्नावर सविस्तर अभ्यास केला पाहिजे. कर सल्लागारांशी सल्ला मसलत करून डिबेंचर किती, कशाप्रकारे द्यायचा की तो द्यायचाच नाही याबाबत एकदाच काय तो निर्णय घ्यावा. दरवेळी आरोपी म्हणून आपण पिंजऱ्यात कशासाठी उभारायचे, असा उद्विन प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर एकदाचा संचालक मंडळांनी पडदा पाडावा. तसेच यासंदर्भात दूध संस्थांकडून मत मागून अंतिम निर्णय घ्यावा. यापुढे डिबेंचरचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही हसन मुश्रीफ यांनी संचालकांना खडसावून सांगितले.