कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संघांना वाटप करावयाच्या ‘डिबेंचर’मधील ४० टक्के रक्कम कपात करून स्वतः कडे ठेवली आहे. ही रक्कम दूध संस्थांना तातडीने द्यावी, अन्यथा संघाला एक थेंब दुधाचा पुरवठा केला जाणार नाही. शिवाय, गोकुळच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा बुधवारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दरवर्षी डिबेंचर स्वरूपात रक्कम दूध संस्थांना दिली जाते. यावर्षीही प्रतिलिटर सुमारे सव्वा रुपये ही रक्कम दिली आहे. याबाबत गोकुळने यावर्षी विक्रमी रक्कम दूध संस्थांना दिली असल्याचा डंका पिटला आहे.

दूध संस्थांना त्रास

तथापि यातील वास्तव वेगळेच आहे. गोकुळने दूध संस्थांचे ४० टक्के ‘डिबेंचर’ची रक्कम संघाकडे ठेवून घेतली आहे. यामुळे दूध संघांना त्यांच्या सभासदांना दिवाळीसाठी अनुदान देण्यामध्ये अडचण येत आहेत. दूध संघ व दूध उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये यातून वाद निर्माण होत आहेत. दूध संघांना निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दूध दरात कपात

यामुळे गोकुळने कपात केलेली ४० टक्के ‘डिबेंचर’ची रक्कम दूध संघांना तातडीने द्यावी, अन्यथा गोकुळ दूध संघास दूध उत्पादक दुधाचा एक थेंबही घालणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. लाळ खुरकत, लंपी चर्मरोग यामुळे पशुपालक अडचणीत आहेत. गोकुळ दूध संघाने वारंवार गाईच्या दुधामध्ये कपात केल्याने पशुपालकांना हे परवडण्यासारखे नाही. याचा विचार करून गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ व संचालक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांच्या खात्यावर तातडीने रक्कम जमा करावी. अन्यथा गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही घोडके, शिंदे यांनी दिला. यावेळी बाबासाहेब पाटील, युवराज शेलार यांच्यासह संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना पशुखाद्य वाटप

गोकुळ दूध संघामार्फत अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व पशुपालकांना मदतीचा हात म्हणून महालक्ष्मी पशुखाद्य १० मे. टन व टीएमआर मॅश ८ मे. टन मदत सोलापूर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांचेकडे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बयाजी शेळके यांच्या हस्ते सोलापूर येथे सुपूर्त करण्यात आली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.