गोकुळ संघ यावर्षी म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थाच्या खात्यावर बुधवारी जमा करणार आहे. गतसालच्या तुलनेत १९ कोटी रुपयेजादा रक्कम मिळणार असल्याने दूध उत्पादकांची दिवाळी गोड होईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात, असा उल्लेख करून अध्यक्ष पाटील म्हणाले, संघाच्या वैरण बियाणे, चाफकटर, मिल्को टेस्टर, वासरू संगोपन अनुदान, जातिवंत म्हैस व गाय संगोपन अनुदान, दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी योजना, किसान पॅकेज, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा अशा २७ योजनेवर प्रतिलिटर ७५ पैसे म्हणजेच अंदाजे ३७ कोटी ४१ लाख इतकी रक्कम उत्पादकांना अनुदान व सेवाप्रित्यर्थ दिले आहेत.

राज्यभरातून दूध आणणार

मुंबईमध्ये महानंद या राज्याच्या शिखर दूध संघाच्या दूध पॅकिंगचे काम केल्याने गोकुळ दूध संघाला १७ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. गोकुळ दूध संघाकडे नांदेड,सोलापूर, सांगली आदी भागातून घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता बाहेरून दूध आणण्याचे गोकुळचे नियोजन राहील, असे माजी पालकमंत्री मंत्री सतेज पाटील म्हणाले.

लंम्पि रोगाला आवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात लंम्पि चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना गोकुळने वेळीच उपाययोजना केल्याने जिल्ह्यात अधिक फैलाव झाला नाही. पाच लाख जनावरांचे लसीकरण करण्याचे गोकुळने ठरवले असून त्यापैकी दोन लाख लसीकरण झाले आहे, अशी माहिती माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.