कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळी २४ तासांत चार फुटाने वाढ झाली. ती बुधवारी हळूहळू इशारा पातळीच्या दिशेने सरकू लागली होती. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ६४ इतकी झाली आहे. शंभराहून अधिक मार्गांवर वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असला तरी आज शहरात पावसाची उघडीप सुरू होती. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणी पातळी काल ३०.४ फूट होती. ती बुधवारी दुपारी तीन वाजता ३४.३ फूट होती. ३९ फूट इशारा पातळी आहे. पाणी विसर्ग ३१ हजार वरून ३५,११५ क्युसेस करण्यात आला आहे. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या एका दिवसात ३० वरून ६३ इतकी दुप्पट झाली आहे.
कळंबा तुडुंब
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा दक्षिणेला असलेला कळंबा तलाव दरवर्षी जुलै अखेरीस व ऑगस्टच्या सुरुवातीला भरत असतो. पण यावर्षी मात्र तो आताच पूर्णपणे भरला आहे. जिल्ह्यातील सर्वच छोटे तलाव शंभर टक्के भरले आहेत.
वाडीत दक्षिणद्वार सोहळा
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बुधवारी दुपारी एक वाजता श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथील दत्त देवस्थान दक्षिणद्वार सोहळा झाला. कृष्णचे पाणी उत्तरेकडे येऊन ते दत्त चरणाकडून खाली दक्षिणेला जाते. याला दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते. दिगंबरा दिगंबराच्या गजरात भाविकांनी कृष्णा स्नान केले. उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.