कोल्हापूर : खेळाडू घडवणे हे प्रयत्नशील, कष्टसाध्य तद्वत ते खर्चिक काम आहे. खेळाच्या माध्यमातून काहींना नोकरीची संधी प्राप्त होते. इतरांची उपेक्षा होते. उगवत्या खेळाडूंना आर्थिक आधार, प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्रँड कोल्हापूर’च्या संयोजन समितीने दानशूर व्यक्ती, संस्थांकडून निधी संकलित करून कायमस्वरूपी निधी उभा करावा, असा सल्ला नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी शनिवारी येथे दिला. त्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर करत त्यांनी उक्ती – कृतीचा मेळ घातला.
यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते उपस्थितीत डॉ. सुरेश शिपुरकर आणि शैलजा साळोखे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कादंबरीकार कृष्णात खोत, ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसाळे, सचिन सूर्यवंशी, बिरदेव ढोणे, सौरभ पाटील, हेमराज पनोरेकर, दिलीप देसाई, आदिती चौगुले, मयूर कुलकर्णी, प्रशांत बिडकर यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार सतेज पाटील यांनी खेळाडूंसाठी ‘ब्रँड कोल्हापूर’ संयोजन समितीच्या निधीसाठी पाच लाख रुपये निधी जाहीर केला. पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात म्हणाले, जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो समाज शिस्त, सांघिक भावना, यश आणि खिलाडू वृत्तीचे खेळाडू तयार करतो. खेळाडू वृत्ती ही जात, धर्म अथवा श्रद्धेला बळी पडत नाही.
संयोजन समिती सदस्य भरत दैनी यांनी स्वागत केले. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात त्यांचा सत्कार केला. संयोजन समिती सदस्य, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी थोरात यांचा परिचय करून दिला. जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळोखे यांचा परिचय प्राचार्य अजय दळवी, अनुराधा कदम यांनी करून दिला. यानंतर पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला बाळ पाटणकर, श्रीराम पवार, रवींद्र ओबेरॉय, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ. आर. एम. कुलकर्णी, अनंत खासबागदार, चेतन चव्हाण, अजय दळवी, प्रा. राजेंद्र रायकर, ऐश्वर्या मालगावे, संग्राम भालकर, सचिन लोंढे, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.