कोल्हापूर/वाई : करोना संसर्गाची लागण झालेल्या एका ७३ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. कोल्हापुरात नव्या दोन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मूळची पलूस (जि. सांगली) येथील ही महिला पाचगाव (ता. करवीर) येथील नातेवाइकांकडे आली होती. करोना संसर्गाची लागण झाल्यावर तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सीपीआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. स्थूलता असलेल्या या महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब विकार होते, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णवाढ
महापालिका क्षेत्रातील ५९ वर्षीय आणि ६९ वर्षीय अशा नव्या दोन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२ वर पोहोचली आहे. त्यापैकी सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर पाच रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्याचे आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही करोना रुग्ण वाढत आहेत.
साताऱ्यात एका महिलेचा मृत्यू
शनिवारी सत्तर वर्षांच्या महिलेचा (रा. कोडोली, सातारा) मृत्यू झाला. या महिलेला खासगी रुग्णालयात जीवरक्षक (व्हेंटिलेटरवर) यंत्रणेवर असताना जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले होते. करोना नियमानुसार या महिलेचा अंत्यविधी करण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णालयात करोनाचे चार रुग्ण आहेत. त्यापैकी आज दोघांना प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. करपे यांनी दिली.